ICC Rankings : आयसीसी रँकिंगमध्ये मोठा फेरबदल; रोहित-तिलकची भरारी तर बाबर-हेडची घसरण

ICC latest Rankings Updates : आयसीसीने बुधवारी पुरुष खेळाडूंची नवीन रँकिंग जाहीर केली असून, यामध्ये मोठा फेरबदल झाला आहे. भारतीय वनडे संघाचा कर्णधार रोहित शर्माला कोणताही सामना न खेळता फायदा झाला आहे. तो वनडे फलंदाजांच्या यादीत एका स्थानाने पुढे सरकत दुसऱ्या क्रमांकावर पोहोचला आहे. त्याच्या खात्यात सध्या 756 रेटिंग गुण आहेत. भारताने शेवटचा वनडे सामना मार्च 2025 मध्ये खेळला होता, परंतु पाकिस्तानचा फलंदाज बाबर आझमच्या खराब कामगिरीचा रोहितला लाभ झाला.
बाबर आझमने वेस्टइंडीजविरुद्धच्या तीन सामन्यांच्या वनडे मालिकेत निराशाजनक कामगिरी केली. त्याने मालिकेतील शेवटच्या दोन सामन्यांत अनुक्रमे शून्य आणि 9 धावा केल्या, ज्यामुळे त्याला 751 गुणांसह तिसऱ्या स्थानावर खाली सरकावे लागले. वनडे फलंदाजांच्या पहिल्या दहामध्ये भारताचे चार फलंदाज आहेत. शुबमन गिल 784 गुणांसह पहिल्या क्रमांकावर कायम आहे. स्टार फलंदाज विराट कोहली 736 गुणांसह चौथ्या, तर श्रेयस अय्यर 704 गुणांसह आठव्या स्थानावर आहे.
टी-20 रँकिंगमध्येही तिलक वर्माची कमाल –
Rohit Sharma number two in ODI rankings 🤝 Tilak Varma number two in T20I rankings. pic.twitter.com/RrYA0f2z9f
— R A T N I S H (@LoyalSachinFan) August 13, 2025
आयसीसीच्या पुरुष टी-20 रँकिंगमध्येही बदल झाले आहेत. भारताचा युवा फलंदाज तिलक वर्मा एका स्थानाने पुढे सरकत दुसऱ्या क्रमांकावर पोहोचला आहे. त्याच्याकडे 804 रेटिंग गुण आहेत. तिलकने शेवटचा टी-20 आंतरराष्ट्रीय सामना फेब्रुवारी 2025 मध्ये खेळला होता. ऑस्ट्रेलियाचा फलंदाज ट्रॅव्हिस हेडच्या खराब कामगिरीचा त्याला फायदा झाला. हेडने दक्षिण आफ्रिकेविरुद्धच्या सध्याच्या टी-20 मालिकेतील पहिल्या दोन सामन्यांत अनुक्रमे 2 आणि 5 धावा केल्या, ज्यामुळे तो 782 गुणांसह दोन स्थानांनी घसरून चौथ्या क्रमांकावर आला. इंग्लंडचा फिल सॉल्ट 791 गुणांसह तिसऱ्या, तर भारताचा अभिषेक शर्मा 829 गुणांसह पहिल्या स्थानावर कायम आहे.
कसोटी गोलंदाजी रँकिंगमध्ये हेनरीची झेप –
न्यूझीलंडचा वेगवान गोलंदाज मॅट हेनरीने झिम्बाब्वेविरुद्धच्या टेस्ट मालिकेत 2-0 अशा विजयात मोलाचा वाटा उचलला. त्याने 9.12 च्या सरासरीने 16 विकेट्स घेतल्या आणि मालिकेचा सर्वोत्तम खेळाडू ठरला. यामुळे त्याने कसोटी गोलंदाजांच्या रँकिंगमध्ये एका स्थानाची प्रगती करत 846 गुणांसह तिसरे स्थान मिळवले, जे त्याच्या कारकिर्दीतील सर्वोच्च रेटिंग आहे. ऑस्ट्रेलियाचा कर्णधार पॅट कमिन्स 838 गुणांसह चौथ्या, दक्षिण आफ्रिकेचा कगिसो रबाडा 851 गुणांसह दुसऱ्या, तर भारताचा स्टार वेगवान गोलंदाज जसप्रीत बुमराह 889 गुणांसह पहिल्या स्थानावर कायम आहे.





