ICC Rankings : जो रूट पुन्हा कसोटी क्रमवारीत अव्वल, तर टी-20 मध्ये यशस्वी जैस्वाल चमकला…

ICC Test & T20 Rankings :भारताचा स्फोटक फलंदाज यशस्वी जैस्वालने आयसीसीने जाहीर केलेल्या क्रमवारीत मोठी प्रगती केली आहे. जैस्वाल व्यतिरिक्त शुभमन गिलनेही टी-20 फलंदाजी क्रमवारीत मोठी झेप घेतली आहे. तर सूर्यकुमार यादवला अजूनही टी-20 क्रिकेटमध्ये ऑस्ट्रेलियन सलामीवीर ट्रॅव्हिस हेडकडून अव्वल स्थान हिरावून घेता आले नाही.
दुसरीकडे, जर आपण कसोटी क्रमवारीबद्दल बोललो तर, वेस्ट इंडिजविरुद्धच्या 3 कसोटी सामन्यात 291 धावा करणारा जो रूट फलंदाजी क्रमवारीत अव्वल स्थानावर आला आहे. न्यूझीलंडचा महान फलंदाज केन विल्यमसन दीर्घकाळ कसोटी क्रमवारीत अव्वल क्रमांकावर कायम होता, मात्र आयसीसी कसोटी क्रमवारीत इंग्लंडचा दिग्गज फलंदाज जो रूटचा जलवा पुन्हा एकदा पाहायला मिळाला आहे. तो पुन्हा एकदा नंबर वन (अव्वल) कसोटी फलंदाज बनला आहे. त्याने केन विल्यमसनची बादशाहत संपवली आहे.
भारतीय युवा फलंदाजाची मोठी झेप…
नुकत्याच झालेल्या तीन टी-20 सामन्यांच्या मालिकेत भारताने श्रीलंकेवर निर्विवाद वर्चस्व गाजवले आहे. या मालिकेत भारताच्या यशस्वी जैस्वालने 3 सामन्यात 177 च्या स्ट्राईक रेटने एकूण 80 धावा केल्या. यामुळे त्याला टी-20 फलंदाजीच्या क्रमवारीत दोन स्थानांचा फायदा झाला आहे. जयस्वाल आता सहाव्या स्थानावरून चौथ्या स्थानावर पोहोचला आहे. दुसरीकडे, शुभमन गिलने 16 स्थानांची मोठी झेप घेत कारकिर्दीतील सर्वोच्च रँकिंग गाठले आहे. गिल आता टी-20 क्रिकेटमधला 21व्या क्रमांकाचा फलंदाज बनला आहे. टी-20 क्रमवारीत टाॅप-3 बद्दल बोलायचे झाले तर चांगली गोष्ट म्हणजे टी-20 फलंदाजी क्रमवारीत टॉप-10 मध्ये तीन भारतीय आहेत. सध्या ऑस्ट्रेलियाचा ट्रॅव्हिस हेड 844 गुणांसह अव्वल स्थानावर असून त्याच्यानंतर भारतीय कर्णधार सूर्यकुमार यादव दुसऱ्या स्थानावर आहे. त्याच्या खात्यात 805 गुण आहेत. फिल सॉल्ट तिसऱ्या स्थानावर घसरला आहे. यशस्वी जैस्वालने चौथे स्थान पटकावले आहे आणि टॉप-10 मध्ये तिसरा आणि शेवटचा भारतीय ऋतुराज गायकवाड आठव्या स्थानावर कायम आहे.
जो रूट पुन्हा अव्वल…
इंग्लंडचा जो रूट पुन्हा एकदा कसोटी क्रिकेटमधील नंबर-1 फलंदाज बनला आहे. त्याने वेस्ट इंडिजविरुद्धच्या 3 कसोटी सामन्यांमध्ये एक शतक आणि 2 अर्धशतकांच्या मदतीने एकूण 291 धावा केल्या. या कामगिरीमुळे जो रूटने केन विल्यमसनला मागे टाकत कसोटी फलंदाजी क्रमवारीत पहिले स्थान पटकावले आहे. याशिवाय पाकिस्तानचा कर्णधार बाबर आझमलाही एका स्थानाचा फायदा झाला असून त्यामुळे तो तिसऱ्या स्थानावर विराजमान झाला आहे. जो रूटचे 872 गुण आहेत, तर केन विल्यमसनचे 859 रेटिंग गुण आहेत.
कसोटी क्रिकेटच्या टॉप-10 फलंदाजांच्या क्रमवारीतही तीन भारतीय आहेत, पण दुर्दैवाने टॉप-5 मध्ये एकही भारतीय नाही. कर्णधार रोहित शर्मा एका स्थानाने प्रगती करत सहाव्या स्थानावर पोहोचला आहे. त्यांच्याशिवाय यशस्वी जैस्वालने आठवे आणि विराट कोहलीने दहावे स्थान कायम राखले आहे.





