ICC Men’s Test Bowling Rankings : उपखंड व खासकरुन भारतीय खेळपट्ट्यांवर आपल्या भन्नाट गोलंदाजीने प्रतिस्पर्धी फलंदाजांना हादरवणारा भारताचा अनुभवी ऑफस्पिनर रविचंद्रन अश्विनने बुधवारी आंतरराष्ट्रीय क्रिकेट परिषदेने (ICC) जाहीर केलेल्या कसोटी गोलंदाजांच्या क्रमवारीत आपले अव्वल स्थान कायम राखले आहे, तर देशबांधव जसप्रीत बुमराह चौथ्या स्थानावर पोहोचला आहे.
इंग्लंडविरुद्धच्या पहिल्या कसोटीत भारताचा 28 धावांनी पराभव झाला तेव्हा अश्विनने या सामन्यात सहा विकेट घेतल्या. त्याच्या नावावर 853 रेटिंग गुण आहेत. वेगवान गोलंदाज बुमराहनेही या सामन्यात सहा विकेट घेतल्या, ज्यामुळे तो चौथ्या स्थानावर पोहोचला आहे. गोलंदाजीत अव्वल 10 मध्ये तिसरा भारतीय डावखुरा फिरकी गोलंदाज रवींद्र जडेजा सहाव्या क्रमांकावर आहे. गोलंदाजीत दुसऱ्या स्थानावर 851 गुणांसह आफ्रिकेचा कगिसो रबाडा तर तिसऱ्या स्थानावर पॅट कमिन्स (828 गुण) आहे तर 825 गुणासह भारताचा जसप्रीत बुमराह चौथ्या स्थानावर आहे. पाचव्या स्थानावर आॅस्ट्रेलियासाच जोश हेझववूड (818) आहे.
जडेजा कसोटी अष्टपैलू खेळाडूंच्या क्रमवारीत अव्वल स्थानावर आहे. अष्टपैलू खेळाडूंच्या यादीत इंग्लंडचा जो रूट चौथ्या स्थानावर पोहोचला आहे. चेंडूसह आपली चांगली कामगिरी सुरू ठेवण्यात तो यशस्वी ठरला तर तो या यादीतील पहिल्या तीन खेळाडूंना (जडेजा, अश्विन आणि शकीब अल हसन) कडवी टक्कर देऊ शकतो. आपल्या शानदार फलंदाजीसाठी ओळखल्या जाणाऱ्या रूटने हैदराबाद कसोटीत पाच विकेट्स घेतल्या होत्या. दुसऱ्या डावातही त्याने गोलंदाजीला सुरुवात केली होती. अक्षर पटेल या यादीत सहाव्या स्थानावर घसरला आहे.
पहिल्या दहा फलंदाजांमध्ये फक्त एक भारतीय..
भारताचा अनुभवी विराट कोहली हा सहाव्या क्रमांकावर असलेल्या पहिल्या 10 फलंदाजांमध्ये एकमेव भारतीय आहे. भारताविरुद्ध दुसऱ्या डावात 196 धावा करणारा इंग्लंडचा ऑली पोप 20 स्थानांनी झेप घेता 15व्या स्थानावर पोहोचला आहे. पोपचा इंग्लंडचा सहकारी बेन डकेटनेही आपल्या क्रमवारीत सुधारणा केली आहे. भारताविरुद्ध 35 आणि 47 धावांची खेळी खेळल्यानंतर त्याने पाच स्थानांची प्रगती करत 22 वे स्थान पटकावले आहे. ऑस्ट्रेलियाचा सलामीवीर उस्मान ख्वाजा याने वेस्ट इंडिजविरुद्ध गाब्बा येथे खेळल्या गेलेल्या दुसऱ्या कसोटी सामन्याच्या पहिल्या डावात अर्धशतक झळकावल्यानंतर त्याने दोन स्थानांची सुधारणा करत आठव्या स्थानावर झेप घेतली आहे.
वेस्ट इंडिजच्या खेळाडूंच्या क्रमवारीतही सुधारणा…
ऑस्ट्रेलियाविरुद्धच्या कसोटी सामन्यात चांगली गोलंदाजी करणाऱ्या वेस्ट इंडिजच्या खेळाडूंनाही क्रमवारीत सुधारणा करण्यात यश आले. केमार रोच दोन स्थानांनी पुढे सरकून 17व्या, अल्झारी जोसेफ चार स्थानांनी प्रगती करत 33व्या स्थानावर पोहोचला आहे आणि गाबा येथे सामनावीर ठरलेला शामर जोसेफ 42 स्थानांनी प्रगती करत 50व्या स्थानावर पोहोचला आहे.