ICC Champions Trophy 2025 : ‘या’ 8 संघांमध्ये खेळली जाणार चॅम्पियन्स ट्रॉफी, श्रीलंका-वेस्ट इंडिज ‘या’ कारणामुळे ठरले अपात्र…

Champions Trophy 2025 | चॅम्पियन्स ट्रॉफी 2025 चे यजमानपद पाकिस्तानकडे आहे. मात्र, टीम इंडियाविरुद्धचे सामने तटस्थ ठिकाणी होणार आहेत. या स्पर्धेत एकूण 8 संघ सहभागी होणार आहेत. मागील 2023 एकदिवसीय विश्वचषक स्पर्धेच्या गुणतालिकेवरून या स्पर्धेसाठी 8 संघ निश्चित करण्यात आले आहेत. मात्र, यावेळच्या चॅम्पियन्स ट्रॉफीसाठी श्रीलंका आणि वेस्ट इंडिजसारखे संघ पात्र ठरू शकले नाहीत.
साल 2023 च्या एकदिवसीय विश्वचषक स्पर्धेत 10 संघांनी भाग घेतला होता. गुणतालिकेत टॉप-8 मध्ये स्थान मिळवणारे संघ चॅम्पियन्स ट्रॉफीसाठी पात्र ठरले, ज्यात यजमान पाकिस्तानचाही समावेश आहे.
चॅम्पियन्स ट्रॉफीसाठी पात्र ठरलेले संघ – अफगाणिस्तान, ऑस्ट्रेलिया, बांगलादेश, इंग्लंड, भारत, न्यूझीलंड, दक्षिण आफ्रिका आणि पाकिस्तान.
श्रीलंका आणि वेस्ट इंडिज का होऊ शकले नाहीत पात्र ?
श्रीलंका : श्रीलंकेने 2023 चा एकदिवसीय विश्वचषक खेळला. गुणतालिकेत संघ नवव्या क्रमांकावर होता, यामुळे संघ चॅम्पियन्स ट्रॉफीसाठी पात्र ठरू शकला नाही.
वेस्ट इंडिज : 2023 मध्ये खेळल्या जाणाऱ्या एकदिवसीय विश्वचषकासाठीच वेस्ट इंडिजचा संघ पात्र ठरू शकला नव्हता. अशा परिस्थितीत संघ चॅम्पियन्स ट्रॉफीसाठी पात्र ठरण्याचा प्रश्नच उद्भवत नाही.
दरम्यान, टीम इंडियाने चॅम्पियन्स ट्रॉफीसाठी पाकिस्तान दौरा करण्यास नकार दिला होता. यानंतर आयसीसीने तोडगा काढला की टीम इंडिया ही स्पर्धा तटस्थ ठिकाणी खेळेल म्हणजेच ही स्पर्धा हायब्रीड माॅडेलनुसार खेळवली जाणार आहे.
Border-Gavaskar Trophy 2024/25 : मॅकस्वीनीला वगळणे ही मोठी चूक – मायकल क्लार्क
पाकिस्तान आहे गतविजेता…
चॅम्पियन्स ट्रॉफीची शेवटची आवृत्ती 2017 मध्ये खेळली गेली होती, ज्यामध्ये पाकिस्तानने बाजी मारली होती. या संदर्भात, पाकिस्तान या स्पर्धेचा गतविजेता आहे. विशेष म्हणजे 2017 मध्ये पाकिस्तानने भारताला हरवून चॅम्पियन्स ट्रॉफी जिंकली होती. या सामन्यात पाकिस्तानने प्रथम फलंदाजी करताना 50 षटकात 4 बाद 338 धावा केल्या. त्यानंतर प्रत्युत्तरात लक्ष्याचा पाठलाग करताना टीम इंडिया 30.3 षटकांत अवघ्या 158 धावांत ऑलआऊट झाली. पाकिस्तानने 180 धावांनी विजय मिळवला होता.





