PCB Loss in Champions Trophy : पाकिस्तानला चॅम्पियन्स ट्रॉफीत मोठा फटका! खेळाडूंना मोजावी लागली किंमत

Pakistan loses by hosting Champions Trophy 2025 : पाकिस्तानने चॅम्पियन्स ट्रॉफी २०२५ स्पर्धेचे आयोजन मोठ्या उत्साहात केले होते. २९ वर्षांनंतर देशात पहिल्यांदाच होणाऱ्या या आयसीसी स्पर्धेतून पाकिस्तान क्रिकेट बोर्डाला मोठा नफा मिळवायचा होता. पण घडलं उलटंच. चॅम्पियन्स ट्रॉफीचे आयोजन करताना पीसीबीला मोठे नुकसान सहन करावे लागले. अहवालानुसार, पाकिस्तान क्रिकेट बोर्डाला सुमारे ८५ टक्के नुकसान झाले आहे. पाकिस्तानने एकूण ८६९ कोटी रुपये खर्च केले होते. पण त्याचा संघ त्याच्या घरच्या मैदानावर फक्त एकच पूर्ण सामना खेळू शकला.
पीसीबीने रावळपिंडी, लाहोर आणि कराची येथील तीन चॅम्पियन्स ट्रॉफी स्थळांचे अपग्रेडेशन करण्यासाठी सुमारे $58 दशलक्ष खर्च केले. द टेलिग्राफच्या अहवालानुसार, हे त्यांच्या बजेटपेक्षा ५० टक्के जास्त होते. याशिवाय, त्यांनी स्पर्धेच्या तयारीसाठी ४० दशलक्ष डॉलर्स खर्च केले. पंरतु, त्यांची कमाई फक्त $6 दशलक्ष होती, जी त्याने होस्टिंग फी, तिकीट विक्री आणि प्रायोजकत्वातून मिळवली. अशाप्रकारे, पाकिस्तानला सुमारे ८५ दशलक्ष डॉलर्सचे नुकसान झाले आहे.
मोहम्मद रिझवानच्या नेतृत्वाखालील पाकिस्तानने घरच्या मैदानावर फक्त एकच सामना खेळला. हा सामना लाहोरच्या गद्दाफी स्टेडियमवर न्यूझीलंडविरुद्ध खेळला गेला. पाकिस्तानचा पुढचा सामना बांगलादेशविरुद्ध रावळपिंडी येथे होता, जो पावसामुळे रद्द झाला. याशिवाय, पावसाचा इतर दोन सामन्यांवरही परिणाम झाला.
या नुकसानीची किंमत खेळाडूंना मोजावी लागली –
या अहवालात पुढे म्हटले आहे की पीसीबीच्या या नुकसानाचा फटका खेळाडूंना सहन करावा लागला आहे. राष्ट्रीय टी-२० चॅम्पियनशिपसाठीच्या सामन्यांच्या शुल्कात ९० टक्क्यांपर्यंत कपात करण्यात आली आहे. याशिवाय खेळाडूंसाठी असलेल्या सुविधाही कमी करण्यात आल्या आहेत. या स्पर्धेदरम्यान, क्रिकेटपटूंना पंचतारांकित हॉटेलमध्ये राहावे लागत असे. यावेळी त्यांना बजेट हॉटेल्समध्ये राहण्याची सोय केली जात आहे. मात्र, क्रिकेट प्रशासक अजूनही कोट्यवधींचे पगार घेत आहेत.
देशांतर्गत सामन्यांच्या शुल्कात कपात –
पाकिस्तानी राष्ट्रीय दैनिक डॉननेही याबद्दल वृत्त प्रकाशित केले आहे. त्यानुसार, कोणतीही अधिकृत घोषणा न करता, पीसीबीने देशांतर्गत सामन्यांचे शुल्क ४० हजार रुपयांवरून १० हजार रुपये केले. तथापि, पीसीबीचे अध्यक्ष मोहसीन नक्वी यांनी हस्तक्षेप केला आणि निर्णय नाकारला. त्यांनी बोर्डाच्या स्थानिक क्रिकेट विभागाला या प्रकरणाची पुन्हा चौकशी करण्यास सांगितले आहे. मात्र, पीसीबीने अद्याप नवीन मॅच फीबद्दल माहिती दिलेली नाही. पण सूत्रांचे म्हणणे आहे की, ते प्रति सामना ३० हजार रुपयांपर्यंत असू शकते. या प्रकरणात, ते गेल्या वर्षीपेक्षा १० हजार रुपये कमी असेल.





