Rohit Sharma : रोहित शर्माच्या विधानाने खळबळ! चॅम्पियन्स ट्रॉफी जिंकली गंभीरच्या काळात, पण श्रेय दिलं द्रविडला; नेमकं कारण काय?
Rohit Sharma : चॅम्पियन्स ट्रॉफी २०२५ चा किताब भारताने गौतम गंभीरच्या मार्गदर्शनाखाली जिंकला असला तरी, रोहितने या विजयाचे श्रेय माजी प्रशिक्षक राहुल द्रविड यांच्या काळात सुरू झालेल्या 'प्रक्रियेला' (Process) दिले आहे.

Rohit Sharma credits Rahul Dravid for Champions Trophy win : भारतीय क्रिकेट संघाचा माजी कर्णधार रोहित शर्मा याने नुकतेच एक असे विधान केले आहे, ज्यामुळे विद्यमान मुख्य प्रशिक्षक गौतम गंभीर आणि रोहित यांच्यातील संबंधांवर चर्चा सुरू झाली आहे. चॅम्पियन्स ट्रॉफी २०२५ चा किताब भारताने गौतम गंभीरच्या मार्गदर्शनाखाली जिंकला असला तरी, रोहितने या विजयाचे श्रेय माजी प्रशिक्षक राहुल द्रविड यांच्या काळात सुरू झालेल्या ‘प्रक्रियेला’ (Process) दिले आहे.
काय म्हणाला रोहित शर्मा?
सीएट क्रिकेट रेटिंग अवॉर्ड्स सोहळ्यादरम्यान रोहितला चॅम्पियन्स ट्रॉफी विजयाबद्दल विचारण्यात आले. यावेळी रोहित म्हणाला, “हा विजय म्हणजे केवळ एक-दोन वर्षांच्या मेहनतीचे फळ नाही. आम्ही अनेक वर्षांपासून या प्रवासात होतो. अनेकवेळा आम्ही ट्रॉफीच्या जवळ पोहोचलो पण ती जिंकू शकलो नाही. तेव्हा आम्ही काहीतरी वेगळं करण्याचं ठरवलं. हे काम एका-दोघांचे नव्हते, तर संपूर्ण टीमने या प्रक्रियेला स्वीकारले होते.”
रोहित पुढे म्हणाला, “जेव्हा आम्ही टी-२० विश्वचषकाची तयारी करत होतो, तेव्हा मला आणि राहुल भाईला (द्रविड) एका विशिष्ट प्रक्रियेमुळे खूप मदत झाली. तीच प्रक्रिया आम्ही चॅम्पियन्स ट्रॉफीमध्येही कायम ठेवली.”
गंभीरच्या प्रशिक्षकपदावर प्रश्नचिन्ह?
विशेष म्हणजे, २०२४ चा टी-२० विश्वचषक जिंकल्यानंतर राहुल द्रविड यांचा कार्यकाळ संपला आणि गौतम गंभीरची मुख्य प्रशिक्षकपदी नियुक्ती झाली. गंभीरच्या नेतृत्वाखाली भारताने २०२५ ची चॅम्पियन्स ट्रॉफी जिंकली. मात्र, रोहितने गंभीरचे नाव न घेता द्रविड यांच्या काळातील नियोजनाचा उल्लेख केल्याने क्रिकेट वर्तुळात भुवया उंचावल्या आहेत. रोहितच्या या विधानामुळे गंभीर नाराज होऊ शकतो, अशी चर्चा आता रंगू लागली आहे.
आत्मसंतुष्ट न राहण्याचा मंत्र –
रोहितने संघातील बदलावर भाष्य करताना सांगितले की, “चॅम्पियन्स ट्रॉफीमध्ये खेळणाऱ्या प्रत्येक खेळाडूचा एकच विचार होता – स्वतःला आव्हान देणे आणि कोणत्याही गोष्टीला हलक्यात न घेणे. विजयासाठी जे आवश्यक आहे तेच करणे, यावर आमचा भर होता.”






