Border-Gavaskar Trophy 2024/25 – बॉर्डर-गावस्कर मालिकेच्या पर्थ येथील पहिल्या लढतीमध्ये ऑस्ट्रेलियाने नॅथन मॅकस्विनीने पदार्पण केले होते. मात्र, पर्थ, ऍडलेड व ब्रिस्बेन कसोटीमध्ये त्याला मोठी धावसंख्या उभारण्यात अपयश आले होते. त्यामुळे मालिका सुरु असताना त्याला संघातून वगळण्याचा निर्णय ऑस्ट्रेलिया क्रिकेट बोर्डाने घेतला. त्याच्या ऐवजी सॅम कोन्स्टासचा ऑस्ट्रेलिया संघात समावेश करण्यात आला आहे. मात्र ऑस्ट्रेलिया क्रिकेट बोर्डाने घेतलेल्या निर्णयावर माजी कर्णधार मायकल क्लार्कने निवडकर्त्यांनी चुका केली असून या निर्णयाने त्याची कारकीर्द देखील पणाला लागू शकते, असा इशारा देखील दिला आहे.
ऑस्ट्रेलिया क्रिकेट बोर्डाने शुक्रवारी चौथ्या व पाचव्या कसोटीसाठी संघाची निवड केली. धक्कादायक म्हणजे केवळ ३ कसोटीमध्ये खेळलेल्या नॅथन मॅकस्विनीला या संघातून डच्चू मिळाला आहे. ऑस्ट्रेलिया क्रिकेट बोर्डाच्या निवडसमितीवर माजी कर्णधार मायकल क्लार्कने टीका केली. तो म्हणाला,
मॅकस्विनीला संघातून वगळण्यात आले आहे, यावर माझा विश्वासच बसत नाही. निवडकर्त्यानी सलामीला कोणाची निवड केली हे महत्वाचे नाही का ? असा रोखठोक सवाल देखील त्याने क्लार्कने ‘बियॉन्ड 23 क्रिकेट’ या पॉडकास्टवर बोलताना उपस्थित केला.
ऑस्ट्रेलियाकडून नॅथन मॅकस्विनी व उस्मान ख्वाज़ा यांनी तीनही लढतीमध्ये सलामीवीरांची भूमिका बजावली होती. मॅकस्विनीने त्याच्या सहा डावांत १०, ०, ३९, नाबाद १०, ९ आणि ४ धावा केल्या होत्या. तर अनुभवी उस्मान ख्वाजा याने तीन सामन्यांत ८, ४, १३, नाबाद ९, २१ आणि ८ धावा केल्या आहेत. जवळपास दोन्ही खेळाडूंसाठी ही मालिका सारखीच राहिली आहे. ३८ वर्षीय उस्मान ख्वाज़ा हा वरिष्ठ फलंदाज आहे. यावर देखील क्लार्कने टिपणी करताना म्हटले की, ऑस्ट्रेलियाकडून कोणताही फलंदाजाचे पदार्पण सोपे नाही. तरुण फलंदाज सर्वात कठीण परिस्थितीचा सामना करत असतो. मॅकस्विनीला तर जगातील सर्वोत्तम गोलंदाज आलेल्या जसप्रीत बुमराहचा सामना करावा लागला आहे. त्याने ऍडलेडमध्ये ४० धावांची खेळी केली होती. ज्यावेळी स्विंग, सीम, या गोष्टींसह बुमराह गोलंदाजी करत होता.
वरिष्ठ खेळाडूंना …
सध्याच्या घडीला ऑस्ट्रेलियाच्या आघाडीच्या फळीतील सर्वच फलंदाज धावांसाठी झगडत आहेत. यामध्ये मार्नस लॅबुशेन, स्टीव्हन स्मिथ यांना देखील काही अपवाद वगळता मोठी खेळी करण्यात अपयश आले आहे. क्लार्कने यासंदर्भात म्हणाला की, स्मिथने शतकी खेळी केली असली तरी देखील तो दबावाखाली खेळत असल्याचे दिसून येत आहे. वरिष्ठ खेळाडूंपैकी सर्वच खेळाडू ३० पेक्षा अधिक वयाचे आहेत. आम्ही केवळ तरुण खेळाडूंना एक-दोन संधी देणार. मात्र वयस्कर खेळाडूंना तसेच संघामध्ये ठेवणार आहोत का? असे म्हणताना त्याने निवड समितीवर टीका केली.
मॅकस्वीनीची कारकीर्द येऊ शकते संपुष्टात
ऑस्ट्रेलिया संघात अनेक वरिष्ठ खेळाडू आहेत जे निवृत्तीच्या वाटेवर आहेत. मालिकेच्या सुरुवातीला तुम्ही मॅकस्वीनीवर विश्वास ठेवला होता, तर त्याचे स्थान या हंगामामध्ये कायम ठेवणे गरजेचे होते. उस्मान ख्वाज़ाने निवृत्ती जाहीर केली तर पुन्हा मॅकस्वीनीला संधी मिळणार नाही. त्यामुळे तो खूप लांब फेकला गेला असेल, त्यामुळे त्याची कारकीर्द देखील संपुष्टात येऊ शकते, असे देखील क्लार्क म्हणाला.