BCCI Blunder : बीसीसीआयची मोठी चूक अन् रोहितचे चाहते संतापले! चॅम्पियन्स ट्रॉफीचं श्रेय चक्क गिलला? ‘त्या’ ग्राफिकमुळे पेटला मोठा वाद
BCCI Blunder : या दिमाखदार सोहळ्याला बीसीसीआयच्या एका चुकीच्या ग्राफिकमुळे गालबोट लागले.

BCCI Blunder in Naman Awards 2026 : बीसीसीआयच्या वार्षिक ‘नमन पुरस्कार २०२६’ सोहळ्यात रविवारी भारतीय क्रिकेटमधील आजी-माजी दिग्गजांचा गौरव करण्यात आला. मात्र, या दिमाखदार सोहळ्याला गालबोट लागले ते बीसीसीआयच्या एका चुकीच्या ग्राफिकमुळे. भारताला चॅम्पियन्स ट्रॉफी २०२५ जिंकून देणारा कर्णधार रोहित शर्मा या कार्यक्रमाला अनुपस्थित होता. त्याच्या अनुपस्थितीत व्यासपीठावर आलेल्या शुबमन गिलला चक्क ‘चॅम्पियन्स ट्रॉफी विजेता कर्णधार’ म्हणून दाखवण्यात आले, ज्यामुळे वादाला तोंड फुटले आहे.
नेमकं घडलं काय?
शुबमन गिलला २०२४-२५ हंगामातील सर्वोत्तम कामगिरीसाठी प्रतिष्ठेचा ‘पॉली उमरीगर’ पुरस्कार प्रदान करण्यात आला. ज्यावेळी शुबमन गिल व्यासपीठावर आला, तेव्हा पडद्यावरील ग्राफिकमध्ये त्याच्या नावापुढे ‘ICC चॅम्पियन्स ट्रॉफी विजेता कर्णधार’ असा उल्लेख करण्यात आला होता. प्रत्यक्षात ही स्पर्धा भारताने रोहित शर्माच्या नेतृत्वाखाली जिंकली होती. बीसीसीआयने विनाकारण रोहितला डावलून शुबमनला वनडेचा कर्णधार केल्याची चर्चा आधीच रंगली होती, त्यात या चुकीच्या ग्राफिकमुळे आगीत तेल ओतले गेले आहे.
शुबमन गिल ट्रोलर्सच्या निशाण्यावर –
🚨 BREAKING 🚨
BCCI deleted this post showing Shubman Gill as Champions Trophy captain instead of Rohit Sharma after backlash. https://t.co/YMJyIBWDl6 pic.twitter.com/QWfracPoaf
— Mention Cricket (@MentionCricket) March 15, 2026
बीसीसीआयच्या या चुकीमुळे रोहित शर्माच्या चाहत्यांनी संताप व्यक्त केला असून सोशल मीडियावर शुबमन गिललाही ट्रोल केले जात आहे. “दुसऱ्याच्या कष्टाचे श्रेय लाटणे चुकीचे आहे,” अशा प्रतिक्रिया उमटत आहेत. रोहित शर्मा या सोहळ्याला उपस्थित नसल्याने त्याच्या जागी गिलला उभे करणे समजण्यासारखे असले, तरी त्याला ‘विजेता कर्णधार’ संबोधणे ही मोठी चूक मानली जात आहे.
२०२७ च्या विश्वचषकावर गिलचे लक्ष –
पुरस्कार स्वीकारल्यानंतर शुबमन गिलने २०२७ च्या विश्वचषकाबद्दल भाष्य केले. तो म्हणाला, “२०२३ मध्ये वनडे वर्ल्ड कप जिंकण्याची संधी थोडक्यात हुकली होती, पण पुढच्या वेळी आम्ही पूर्ण ताकदीनिशी उतरू आणि २०२७ चा विश्वचषक जिंकून दाखवू.” या सोहळ्यात स्मृती मानधनाला महिला गटातील सर्वोत्तम आंतरराष्ट्रीय क्रिकेटपटूचा पुरस्कार देण्यात आला.





