House prices: घरांचे दर वाढले 4.3 टक्क्यांनी; रिझर्व बँकेच्या अभ्यास अहवालातील माहिती

मुंबई – व्याजदर उच्च पातळीवर असूनही भारतीय ग्राहकांकडून घरांची मागणी वाढत आहे. अशा परिस्थितीत रिझर्व बँकेने संकलित केलेल्या आकडेवारीनुसार दुसर्या तिमाहीत घरांच्या दरात सर्वसाधारणपणे 4.3 टक्क्यांनी वाढ झाली. पहिल्या तिमाहीत घरांची दर वाढ 3.3 टक्क्यांनी तर गेल्या वर्षी दुसर्या तिमाहीत घरांची दरवाढ 3.5 टक्क्यांनी झाली होती. याचा अर्थ मासिक आणि वार्षिक पातळीवरही घरांच्या दरात वाढ होत आहे.
जर रिझर्व बँकेने व्याजदरात कपात केली नाही तर, घरांच्या विक्रीवर आगामी काळात परिणाम होण्याची शक्यता विकसकांच्या संघटनांनी व्यक्त केली आहे. मध्यमवर्गीयाची क्रयशक्ती कमी झाल्यामुळे अगोदरच मोठ्या शहरात घर विक्रीवर काही प्रमाणात परिणाम झाला आहे. देशातील दहा मोठ्या शहरांमध्ये झालेल्या व्यवहाराच्या आकडेवारीच्या आधारावर रिझर्व बँकेने ही माहिती संकलित केली आहे.
ज्या शहरातील घरांच्या किमतीचा या आकडेवारीसाठी उपयोग करण्यात आला आहे त्यामध्ये अहमादाबाद, बंगळुरू, चेन्नई, दिल्ली, जयपूर, कानपूर, कोची, कोलकत्ता, लखनऊ आणि मुंबई या शहरांचा समावेश आहे. या आकडेवारीबाबत रिझर्व बँकेने म्हटले आहे की, विविध शहरात घरांच्या दरात विविध प्रमाणात वाढ झाली आहे.
बंगळूरु शहरात घरांच्या दरात तब्बल 8.8 टक्क्यांची वाढ झाली आहे. माहिती तंत्रज्ञान आणि इतर क्षेत्रातील कंपन्या या शहरात वाढत आहेत. त्यामुळे बंगळुरू शहरातील घरांचे दर आणि घरांच्या किरायाचे दरही इतर शहराच्या तुलनेत जास्त पातळीवर असतात. या शहरात मागणीपेक्षा पुरवठा कमी असल्यामुळे घरांच्या दरात जास्त प्रमाणात वाढ झाली असल्याचे दिसून येते. कानपूर शहरात घरांचे दर वाढण्याऐवजी दोन टक्क्यांनी कमी झाले आहेत.
आशावाद कायम –
दरम्यान नाईट फ्रँक व नरडॅकोे या संस्थेच्या अहवालानुसार बांधकाम क्षेत्राबाबत विकसक व वित्तीय संस्थांचा आशावाद कायम आहे. एप्रिल- जून या कालावधीत रिअल इस्टेट सेंटीमेंट इंडेक्स 65 होता. तो जुलै – सप्टेंबर या कालावधीत 65 अंकावर गेला. यात फारशी घट झालेली नाही. मात्र पुढील तिमाहीसाठी हा निर्देशांक वाढून 67 इतका झाला आहे. म्हणजे हे क्षेत्र भविष्याबाबत जास्त आशावादी आहे. हा निर्देशांक 50 अंकाच्या वर असल्यानंतर आशावाद जास्त असल्याचे समजले जाते. नाईट फ्रँक इंडियाचे मुख्य व्यवस्थापकीय संचालक शशीर बैजल यांनी सांगितले की, मोठ्या शहरात महाग घरांची विक्री वाढत असल्यामुळे आशवाद कायम आहे.





