Housing prices: पुण्यात घराच्या दरात 9 टक्के तर दिल्लीत 31 टक्क्यांची वाढ

नवी दिल्ली – बांधकामासाठीच्या कच्च्या मालाचे वाढलेले दर आणि वाढलेली मागणी या कारणामुळे डिसेंबरअखेर संपलेल्या तिसर्या तिमाहीत देशातील आठ मोठ्या शहरांमध्ये घरांच्या घरात दहा टक्क्याची वाढ झाल्याची आकडेवारी समोर आली आहे. गेल्या 16 तिमाहीपासून म्हणजे 2021 पासून भारतातील आठ मोठ्या शहरातील घरांचे दर एकतर्फी वाढत आहेत. त्यामुळे हे क्षेत्र आता ताकतीने वाटचाल करीत असल्याचे दिसून येते.
विकासकांची संघटना असलेले क्रेडई आणि रियल इस्टेट कन्सल्टंट कॉलीअर्स इंडिया यांनी संकलित केलेल्या माहितीनुसार या तिमाहीत दिल्ली शहरातील घरांचे दर सर्वात जास्त म्हणजे 31 टक्क्यांनी वाढले आहेत.
क्रेडाईचे राष्ट्रीय अध्यक्ष बोम्मन इराणी यांनी या आकडेवारीबद्दल सांगितले की, घरांच्या किमती वाढत आहेत, याचा अर्थ या क्षेत्रात आत्मविश्वास वाढला आहे. त्याचबरोबर देशातील नागरिकांना घर घेणे त्यातल्या त्यात मोठे घर घेणे आवश्यक वाटत आहे. त्यामुळे घरांची मागणी करोनानंतर वाढत असल्याचे दिसून येते.
जमिनीच्या किमती वाढल्या –
घरासाठी लागणार्या कच्च्या मालाच्या दरात म्हणजे सिमेंट आणि इतर वस्तूच्या दरात वाढ झाली आहे. त्याचबरोबर मोठ्या शहरात घरासाठीच्या जमिनीचे दर वाढले. यामुळे विकसकांना सध्याच्या परिस्थितीत घरांच्या दरात वाढ काढावी लागत आहे. डिसेंबरअगोदर व्याजदरात कपात झाली नव्हती. आता व्याजदरात कपात झाली आहे. त्यामुळे आगामी काळामध्ये या क्षेत्रातील घडामोडी आणखी वाढण्याची शक्यता आहे.
घरांच्या विक्रीत मात्र घट –
विकासकाकडील इन्व्हेंटरी कमी झाली आहे. त्याचबरोबर नवे प्रकल्प कमी प्रमाणात आकारात येत आहेत. अशा परिस्थितीत डिसेंबरअखेर संपलेल्या तिमाहीत घरांच्या दरात जरी 10% वाढ झाली तरी त्या प्रमाणात घराच्या विक्रीत मात्र वाढ झाली नाही. उलट काही प्रमाणात विक्रीत घट झाली आहे. मात्र आता व्याजदर कपातीमुळे घर विक्रीतही वाढ होण्याची शक्यता व्यक्त करण्यात आली.
महाग घरांची जास्त विक्री –
गेल्या चार वर्षापासून म्हणजे करोना नंतर स्वस्त घरापेक्षा महाग घरांची विक्री वाढत आहे. त्यामुळे विकसक अशा प्रकारच्या घराची निर्मिती जास्त प्रमाणात करीत आहेत. मात्र अर्थसंकल्पात किफायतशीर घरावर भर दिला आहे. त्यामुळे आगामी काळात महाग घराबरोबरच किफायतशीर घरांची निर्मिती जास्त प्रमाणात होईल याबाबत काही विकसकांनी आशावाद व्यक्त केला. रखडलेल्या घरांचे प्रकल्पही सरकारने केलेल्या प्रयत्नामुळे वेगाने पूर्ण होण्याची शक्यता आहे.





