देशातील घरांच्या दरात पहिल्या तिमाहीत 3.6% वाढ; नागपूर, चेन्नई आणि कोची आघाडीवर

मुंबई – पहिल्या तिमाहीत म्हणजे एप्रिल- जून या कालावधीत देशातील घरांच्या दरात वार्षिक पातळीवर 3.6 टक्क्यांची वाढ झाली असल्याची माहिती रिझर्व बँकेने जारी केलेल्या अहवालात देण्यात आली.
देशातील 18 मोठ्या शहरातील आकडेवारी संकलित करून हा अहवाल तयार करण्यात आला आहे. नोंदणी कार्यालयाकडून उपलब्ध माहितीच्या आधारावर हा अहवाल तयार करण्यात येतो. अगोदर हा अहवाल तयार करण्यासाठी 2010-11 हे संदर्भ वर्ष म्हणून विचारात घेतले जाते होते. आता हा अहवाल तयार करण्यासाठी 2022-23 हे संदर्भ वर्ष म्हणून गृहीत धरण्यात येत आहे.
रिझर्व बँकेने सांगितले की, गेल्या वर्षी या तिमाहीत घरांच्या किमती 7.6 टक्क्याची वाढल्या होत्या. आता महागाई कमी झाली आहे आणि व्याजदर कमी आहेत. अशा परिस्थितीत घरांच्या किमती 3.6 टक्क्याची वाढल्या आहेत. तिमाही पातळीवर घरांच्या दरात दोन टक्क्यांनी वाढ झाली असल्याचे रिझर्व बँकेने स्पष्ट केले आहे.
विचारात घेतलेल्या 20 शहरांपैकी नागपूर, चंदीगड, चेन्नई, कोची या शहरातील घरांच्या दरात जास्त प्रमाणात वाढ झाली आहे. अगोदर ही आकडेवारी तयार करण्यासाठी दहा शहरातील माहितीचा वापर केला जात होता.
आता त्यामध्ये हैदराबाद, थिरुवनंतपुरम, पुणे, गाजियाबाद, ठाणे, गौतम बुद्धनगर, चंदीगड, नागपूर या आठ शहरांचा समावेश करण्यात आला आहे. त्याचबरोबर मुंबई, दिल्ली, चेन्नई, कोलकत्ता, बंगळुरू, लखनऊ, अहमदाबाद, जयपुर, कानपूर या शहरांचाही यासाठी वापर करण्यात आला आहे.





