नवी दिल्ली – घर उभारणी आणि खरेदीसाठी देशात कमालीचे सकारात्मक वातावरण निर्माण झाले आहे. विस्तारणारा मध्यमवर्ग घर खरेदी करण्यासाठी उत्सुक आहे. अशा परिस्थितीत पुढील काही वर्ष वार्षिक पातळीवर घरांच्या दरात पाच ते दहा टक्क्यांनी वाढ होण्याची शक्यता एका अभ्यास अहवालात व्यक्त करण्यात आली आहे. भारतीय उद्योग महासंघ व कॉलीअर्स इंडिया यांनी या संदर्भात आढावा घेतला आहे आणि रियल स्टेट क्षेत्राची 2047 पर्यंत काय परिस्थिती असेल याबाबत अहवाल जारी केला आहे. सध्या वार्षिक पातळीवर तीन ते चार लाख युनिट घराची विक्री होते. 2047 पर्यंत ही संख्या वार्षिक पातळीवर दहा लाख युनिट इतकी होण्याची शक्यता आहे. घर बांधणीबाबत सरकारचे पूरक धोरण, तरुणांची वाढत असलेली संख्या आणि नागरिकांचे वाढत असलेले उत्पन्न या आधारावर हे मूल्यांकन करण्यात आले आहे. या सर्व बाबी विचारात घेतल्या तर पुढील काही वर्षे वार्षिक पातळीवर घरांच्या दरात 5ते 10 टक्क्याने वाढ होण्याची शक्यता आहे. छोट्या घराबरोबरच आता मोठ्या घरांची विक्री मोठ्या प्रमाणात वाढत आहे. या परिस्थितीत आगामी काळात फारसा फरक पडणार नाही. ही घरनिर्मिती फक्त मेट्रोसारख्या मोठ्या शहरापुरतीच मर्यादित राहणार नाही तर छोट्या शहरातही घर निर्मितीला गेल्या काही वर्षापासून कमालीचा वेग आला आहे. पर्यटन स्थळे आणि अध्यात्मिक केंद्राच्या लगतच्या भागातही घर निर्मिती आणि विक्री वाढत आहे. रिअल इस्टेट क्षेत्राचा व्याप वाढणार सध्याच्या मूल्यांकनुसार भारतातील रियल इस्टेट क्षेत्र 0.3 लाख कोटी डॉलरचे असल्याचे समजले जाते. यामध्ये वेगात वाढ होत असून 2047 पर्यंत हे क्षेत्र पाच ते दहा लाख कोटींची डॉलरचे होईल. केंद्र सरकार देशभरातील पायाभूत सुविधा वाढवीत आहे. त्या आधारावरच इतर क्षेत्राप्रमाणेच रिअल इस्टेट क्षेत्राचा विकास होणार आहे. भारतातील रिअल इस्टेट क्षेत्र कमालीच्या वेगाने नवीन तंत्रज्ञानाचा वापर करत राहणार आहे.