House prices: घरांच्या दरात वाढ नाही: पुणे, दिल्ली, मुंबई, चेन्नई येथील घरांचे दर स्थिर

House prices in Pune – तिमाही पातळीवर भारतातील मोठ्या शहरातील घरांच्या दरात फारसी वाढ झाली नसल्याची आकडेवारी समोर आली आहे. जानेवारी ते मार्च या तिमाहीत पुणे, दिल्ली, मुंबई, चेन्नई येथील घरांचे दर ऑक्टोबर- डिसेंबर या तिमाहीच्या पातळीवर स्थिर राहिले.
प्रॉप टायगर या संस्थेने जारी केलेल्या माहितीनुसार जानेवारी ते मार्च तिमाहीत बंगळुरू आणि हैदराबाद शहरातील घरांचे दर पाच टक्क्यांनी वाढले. त्याचबरोबर या कालावधीत अहमदाबाद आणि कोलकाता शहरातील घरांच्या दरात चार टक्क्यांनी वाढ झाली. या संस्थेने म्हटले आहे की, गेल्या काही वर्षांपासून वार्षिक पातळीवर देशातील मोठ्या शहरात घरांच्या दरात काही प्रमाणात वाढ होत असली तरी गेल्या काही तिमाहीपासून ही वाढ कमी झाली आहे.
प्रॉप टायगर या कंपनीचे मुख्य कार्यकारी अधिकारी ध्रुव अगरवाल म्हणाले की, गेल्या काही तिमाहीपासून घरांच्या दरात फारशी वाढ झालेली नाही. याचा अर्थ हे क्षेत्र स्थिर झाले आहे. यामुळे प्रत्यक्ष वापरासाठी घर घेणार्यांची संख्या वाढणार आहे.
त्याअगोदर गुंतवणूक म्हणून घर खरेदी करणार्यांची संख्या जास्त होती. त्यामुळे घरांच्या दरात जास्त प्रमाणात वाढ होत होती, असे त्यांनी सांगितले. जर घरासाठीच्या कच्च्या मालाच्या दरात फारशी वाढ झाली नाही तर आगामी काळात भारतातील मोठ्या शहरातील घरांच्या दरात जास्त वाढ होणार नाही. गुंतवणुकी ऐवजी वापरासाठी घर खरेदीला चालना मिळेल.
अहमदाबाद शहरातील घरांचे दर या तिमाहित 4,402 रुपये प्रति वर्ग फुटावरून 4,568 रुपये प्रति वगफूट या पातळीवर गेले. बंगळुरू शहरातील घरांचे दर 7,536 रुपयावरून 7,881 रुपये प्रति वर्ग फुटावर आले आहेत. हैदराबाद शहरातील घरांचे दर 7,053 रुपयावरून 7,412 रुपये प्रति वर्गफूट झाले आहेत. तर कोलकाता शहरातील घरांचे दर 5,633 रुपयावरून 5,839 रुपये वर्ग फूट या पातळीवर आले आहेत.
ग्राहकांबरोबर विकसकांनाही आता कमी व्याजावर कर्ज मिळणार आहे. त्यामुळे घरांच्या उत्पादन खर्चात घट होण्याची शक्यता व्यक्त करण्यात येत आहे. याचाही काही प्रमाणात परिणाम घराच्या किमतीवर होऊ शकतो असे समजले जात आहे.





