आमदार चेतन तुपेंना ‘उत्कृष्ट संसदपटू’ पुरस्कार जाहीर

हडपसर – महाराष्ट्र विधानमंडळातील राष्ट्रकुल संसदीय मंडळ महाराष्ट्र शाखेच्या वतीने दिला जाणारा उत्कृष्ट संसदपटू पुरस्कार हडपसर विधानसभा मतदार संघ राष्ट्रवादी काँग्रेसचे आमदार चेतन विठ्ठल तुपे पाटील यांना जाहीर झाला असून मंगळवार ( दि.३ ) रोजी राष्ट्रपती द्रौपदी मुर्मु यांचे हस्ते मुंबई विधान भवनाच्या मध्यवर्ती सभागृहात प्रदान करण्यात येणार आहे.
हडपसर किंवा पूर्वीचा पुणे – कॅन्टोन्मेंट विधानसभा मतदारसंघ यातून निवडून आलेले,असा पुरस्कार मिळवणारे चेतन तुपे पाटील हे पहिलेच आमदार आहेत.माजी मंत्री तत्कालीन आमदार गिरीश बापट यांच्या नंतर वीस वर्षांनी चेतन तुपे पाटलांच्या रूपाने हा पुरस्कार पुणे शहरातील आमदाराला मिळालेला आहे.
विधिमंडळाच्या कामकाजातील नियमित सहभाग, विधिमंडळाच्या नियमांचे कायदेकानून चे काटेकोर पालन, संसदीय परंपरांचे-शिष्टाचारांचे भान,उपस्थित करावयाच्या विषयाचे सर्वकष आकलन,विधिमंडळात विषय मांडताना वापरलेले कौशल्य,संसदपटुत्व,निवडलेले मुद्दे आणि विषय मांडण्याची पद्धत,वक्तृत्व शैली, वेगळ्या उंचीची दर्जेदार उत्कृष्ट संसदीय भाषणे या सगळ्या बाबी पडताळून पाहून पुरस्कारांसाठी नेमलेल्या तज्ञ समितीकडून या पुरस्काराची शिफारस केली जाते.
आणि त्यानुसार राष्ट्रकुल संसदीय मंडळाकडून हे पुरस्कार जाहीर केले जातात. हडपसर विधानसभा मतदारसंघाचे आमदार चेतन तुपे पाटील यांना त्यांच्या पहिल्याच टर्ममध्ये हा उत्कृष्ट संसदपटू पुरस्कार जाहीर झाल्यानंतर विधानसभा मतदारसंघात सर्वत्र त्यांचे कौतुक केले जात आहे.





