हडपसर येथे एलिव्हेटेड रस्ता व मेट्रोच्या कामाला गती द्यावी – आमदार चेतन तुपे

हडपसर – हडपसर रस्त्यावर सध्या असलेली वाहतूक कोंडी पाहता केवळ मेट्रो मार्ग उभारुन प्रश्न सुटणार नाही, तर एलिव्हेटेड रस्ताही बांधणे गरजेचे आहे. त्या अनुषंगाने डीपीआर बनवला जावा,अशी मागणी आमदार चेतन तुपे यांनी केली आहे.
यासाठी तुपे यांनी महा मेट्रोचे व्यवस्थापकीय संचालक श्रावण हर्डीकर यांची भेट घेऊन चर्चा केली आहे. यावेळी खासदार डॉ.अमोल कोल्हे हेही उपस्थित होते. यावेळी पुणे मेट्रोच्या हडपसर मार्गाचे प्राथमिक सादरीकरण मेट्रोच्यावतीने करण्यात आले. मेट्रोचा डीपीआर बनवताना पुढील २५ वर्षांचा विचार करुन कॉम्प्रिहेन्सिव्ह मोबिलिटीचा विचार व्हावा अशी सूचना आमदार तुपेंनी महामेट्रोला केली.
स्वारगेट ते हडपसर आणि पुढे लोणी काळभोर पर्यंत जी मेट्रो मार्गिका आहे त्याचा सविस्तर प्रकल्प आराखडा (डीपीआर) सुरू करण्याचे काम महाविकास आघाडी सरकारने सुरू केले होते. तसेच दुमजली मार्गिका झाल्यास वाहतूक व्यवस्थेवर ताण न येता राष्ट्रीय रस्त्यावरील आणि राज्य महामार्गावरील वाहतूक सुरळीत राहील. हडपसर भागातील वाहतूक यामुळे सुरळीत होईल. या सर्वांचा सातत्याने पाठपुरावा सुरू असल्याचे तुपे यांनी सांगितले.
नागपूर मेट्रोच्या धर्तीवर हडपसरची मार्गिका व्हावी
हडपसर मतदारसंघातील प्रस्तावित मेट्रो कामाबाबत विधानसभेत म्हणणे मांडले आहे.उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्या पुढाकाराने स्वारगेट ते लोणी काळभोर मेट्रोचा प्रस्ताव मंजूर झाला आहे. त्याचा डीपीआर तयार होतो आहे.पुणे – सोलापूर महामार्गावर ही मेट्रो मार्गिका असल्याने नागपूर मेट्रोच्या धर्तीवर ही मार्गिका दुमजली करण्यात यावी. अशी मागणीही केली आहे. तसे पत्र देखील महामेट्रो व राज्य सरकारला दिले आहे.
– चेतन तुपे पाटील,आमदार, हडपसर विधानसभा





