Pune : सोलापूरला जोडणारा सहा पदरी महामार्ग भैरोबा नाला ते यवत व्हावा – आमदार चेतन तुपे

हडपसर – केंद्रीय रस्ते विभागाकडून हडपसर ते यवत असा सहा पदरी इलेव्हेटेड रस्ता प्रस्तावित आहे. तोच रस्ता भैरोबानाला ते यवत करण्यात यावा. याशिवाय या सहा पदरी रस्त्याचे काम शक्य तितक्या लवकर सुरू करण्यात यावे, अशी मागणी आमदार चेतन तुपे यांनी विधानसभेत केली.
पुणे- सोलापूर महामार्ग लगत असलेली गावे आता उपनगरात रूपांतरित होत असून या रस्त्यावर दिवसेंदिवस वाहतूक वाढत आहे. यामुळे वाहतूक कोंडीसह अपघाताचे प्रमाणही वाढत आहे. त्याकारणाने या ठिकाणी इलेव्हेटेड सहापदरी रस्ता होणे गरजेचे आहे, असे आमदार तुपे यांनी सांगितले.
तसेच अधिक माहिती देत त्यांनी सांगितले की, “केंद्रीय मंत्री नितीन गडकरी यांच्या अध्यक्षतेखाली सोलापूर रस्त्यावरील हडपसर ते यवत असा सहापदरी महामार्गाच्या विकास आराखडा तयार करण्याबाबत झालेल्या बैठकीत उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्यासह मी उपस्थित होतो.”
“या बैठकीत मी हडपसरऐवजी भैरोबा नाला ते यवत असा महामार्ग करावा, म्हणजे हडपसरच्या नागरिकांना सोलापूर ते पुढे हैद्राबाद वाहतुकीस मार्ग सोपा होईल अशी सूचना मांडली होती. या सूचनेला विचारात घेत तत्काळ आराखड्यात या महामार्गाचा समावेश करण्यात आला आहे. आता या महामार्गाचे काम तत्काळ सुरू करावे. जेणेकरून हडपसर मतदारसंघातील नागरिकांना मोठा दिलासा मिळेल,” अशी माहिती चेतन तुपे यांनी दिली.
दुमजली मेट्रो मार्ग व पर्यायी रस्ते आवश्यक
‘पुणे शहरात स्वारगेट ते कात्रज, स्वारगेट ते हडपसर व पुढे लोणी काळभोर असा मेट्रो मार्ग प्रस्तावित आहे. यासाठीचा विकास आराखडा तयार झाला असून तो मंजुरीसाठी देण्यात आला आहे. मेट्रो हा नागरिकांच्या जिव्हाळ्याचा विषय आहे. त्यामुळे मेट्रो मार्ग होणे आवश्यक आहे. हा मार्ग दुमजली व्हावा ही मागणी मी सातत्याने करत आहे.
विधानभवनात देखील मी यावर जोर दिला आहे. मेट्रोचे काम सुरू असताना नागरिकांची गैरसोय होऊ नये यासाठी पर्यायी रस्ते तयार होणे देखील तितकेच महत्त्वाचे आहे. यासाठी पाटबंधारे खात्याचे कॅनॉल बुजवून त्यावर पर्यायी रस्ते तयार करावेत. यातून वाहतूक कोंडी सुटेलच आणि पुढील पायाभूत सुविधा उभ्या करण्यासही मदत होईल.’ – चेतन तुपे पाटील, आमदार, हडपसर विधानसभा.





