परीसस्पर्श! शिवकुमार जावडेकर पहिल्या स्मृतिदिनानिमित्त आठवणींना उजाळा…

पंडित जावडेकर असोसिएटस कंपनीचे सहसंस्थापक शिवकुमार जावडेकर यांचा पहिला स्मृतिदिन नुकताच पाळण्यात आला. त्यांच्या आठवणींना दिलेला हा उजाळा…
शिवशी माझी ओळख होऊन तीसहून अधिक वर्षे झाली. या तीन दशकांच्या काळाचा पट डोळ्यांपुढून जात असताना शिवच्या आठवणी मनात रुंजी घालतात. शिवविषयी अनेक जण आजही आदरानं, आपुलकीनं बोलतात. खरं सांगायचं तर शिवसमोरच हे सगळं बोलता आलं असतं, तर तेच हवं होतं. पण आज तो नसताना त्याबद्दल बोलावं, लिहावं लागतं आहे, हे माझं मोठं दुर्दैव आहे.
आपल्याकडेच कस्तुरी आहे, याची कस्तुरीमृगाला कुठं कल्पना असते ? त्या कस्तुरीच्या गंधानंच ते बागडत आपले काम करत राहते. शिवचे तसे होते. त्याच्यात कर्तेपणाचा भाव कधी नव्हता. व्यक्ती असावी, तर अशी. भागीदार, मित्र, मार्गदर्शक आणि
बरंच काही… अंगातली कला, व्यवसायातील सचोटी, माणसांची पारख, असे असंख्य गुण त्याच्यात होते.
त्याचा शो ऑफ त्यानं कधी केला नाही. लोकांना भारी वाटले, तरी त्याच्यातल्या गुणांचं त्याला अप्रूप वाटलं नाही. काही लोकांचं आयुष्यात येण्यानं आयुष्याला परीसस्पर्श लाभत असतो. ज्यांच्या ज्यांच्या आयुष्याला शिवचा असा स्पर्श झाला, त्यांच्या आयुष्याचं सोनंच झालं.
शिव स्पष्टवक्ता होता. आमचे लँड ओनर्स असोत, स्टाफ, सप्लायर्स असोत, की ग्राहक या सर्वांशी संवाद साधताना शिवनं कधीच स्पष्टवक्तेपणा सोडला नाही. त्याचे हे स्पष्टवक्तेपण कधी कोणाला खटकले नाही. संवाद साधायचा तो स्वच्छ, स्पष्टपणे. व्यवहार करायचा तो पारदर्शीपणे. दिला शब्द आम्ही कधी मोडला नाही. म्हणूनच पंडित जावडेकर असोसिएट्स हा ब्रँड वेगळ्या उंचीवर गेला. व्यवसायात कंपनीनं वेगळं स्थान निर्माण केलं.
शिव कधीच कोणतीही गोष्ट फेस व्हॅल्युवर घ्यायचा नाही. समोरचा जे सांगतो आहे, त्या गोष्टी तो स्वतः ताडून, तपासून पाहायचा. त्यातही कोणाला दुखावयाचा हेतू नसे. कोणाच्याही बोलण्यावर तो अंधपणे विश्वास ठेवत नव्हता, त्याचं कारण त्याच्या ज्ञानपिपासू वृत्तीत होतं. सतत नवं काही करून पाहायला शिवला आवडायचं. तो नवनव्या गोष्टी गोष्टी शिकायचा, पाहायचा. त्यातून जे काही चांगलं हाती लागेल, ते इतरांना देण्यासाठी तत्पर असायचा.
आमच्या कामांत दिसणारे वेगळेपण, नावीन्य हे शिवच्या या प्रयोगांतून आलं आहे. केवळ कामात नव्हे, तर एरवी आयुष्यातही असे नवनवे अनुभव घ्यायला त्याला आवडायचे. फिरायची ठिकाणं आणि फिरायचे सीझन तो निवडायचा, ते असेच वेगळे असायचे. जग ज्या परिस्थितीत या ठिकाणांचा अनुभव घेते, त्यापेक्षा थोडा वेगळा अनुभव आपण घेतला पाहिजे.
मग ते देशातले ठिकाण असो, वा परदेशातले, असेच त्याचे धोरण असे. नॉर्वेमध्ये कडाक्याच्या थंडीत नॉर्दर्न लाइट्सची धमाल म्हणूनच आम्ही अनुभवू शकलो. गोल्डन ईगल हा दुर्मीळ पक्षी त्या काळातच तेथे पाहायला मिळतो. हा आनंदही आम्ही तिथं घेतला. नॉर्थ पोलजवळ असलेले ग्रीनलँड त्याला पाहायचे होते. Success shouldn’t necessarily reflect in your life style, असंही आम्ही मानतो. त्यामुळं या सगळ्या भ्रमंतीत शिव कोणत्याही परिस्थितीशी सहज जुळवून घेऊ शकायचा.
त्याची विचारधारा कधी थांबतच नव्हती. आजच्या दिवसात आपण काय काम करायचं आहे, याचा त्याचा आराखडा पक्का असायचा. विचारांत स्पष्टता असल्यानं कमी वेळातही तो अत्यंत उत्कृष्ट, गुणवत्तापूर्ण गुणवत्तापूर्ण व दर्जेदार काम करायचा. वेळ वाचवण्यासाठी तो टू व्हीलरवरून साइटवर जायचा. साइटवर जातानाही त्याच्या मनात पक्के असायचे, की मी नेमके काय काम बघणार आहे.
दुसऱ्या एखाद्या व्यक्तीला साइटवर एखादे काम करण्यास एक तास लागत असेल, तर तेच काम शिव अर्ध्या तासात करून दाखवायचा. त्याचं कारण विचारांतली स्पष्टता. अंगात हुनर इतकी, की अमुक एक गोष्ट होऊ शकत नाही, हे सांगायची एकाही इंजिनिअरची टाप नव्हती. मी करून दाखवतो, असं शिव तेथेच अधिकारवाणीनं सांगायचा.
अनेकदा त्यानं तसं करूनही दाखवलं आहे. व्यवसाय आणि व्यक्तिगत आयुष्यात समतोल साधणं महत्त्वाचं असतं. व्यवसाय करतानाही कुटुंब, मित्रपरिवार, जगण्यातला आनंद हे सगळं आम्ही तितकंच महत्त्वाचं मानलं. त्यामुळं मित्रत्वाच्या नात्यानं माणसं जोडली गेली. फक्त उद्योजक म्हणून असं प्रेम मिळणं अवघड आहे. लोकांचं हे प्रेम, त्यांचा विश्वास हेच आम्ही आमचे यश मानतो.
शिवची लाइफ स्टाइल, फिटनेस हे सगळे ज्यांना माहिती आहे, त्या सर्वांसाठी शिवचं जाणं हा फार मोठा धक्का आहे. मनाची समजूत काढणं केवळ अशक्य आहे. जो आवडतो सर्वांना, तोचि आवडे देवाला, असे म्हटले जाते. पण तरी मला असे वाटते, की शिवची अलौकिक बुद्धिमत्ता, कर्तेपणा, अष्टपैलू गुणांची आणि जाणतेपणाची आपल्या या जगाला कित्येक पटीने गरज होती.
– राहुल पंडित, सहसंस्थापक, पंडित जावडेकर असोसिएटस





