Pimpri : पुण्यतिथीनिमित्त धार्मिक कार्यक्रमांचे आयोजन

तळेगाव दाभाडे : ऐतिहासिक शाळा चौकातील श्री विठ्ठल मंदिर संस्थेच्या वतीने संत शिरोमणी नामदेव महाराज व संतश्रेष्ठ सावता माळी महाराज यांच्या पुण्यतिथीनिमित्त विविध धार्मिक कार्यक्रमांचे आयोजन भक्तिभावाने करण्यात आले.
पहाटे संत नामदेव महाराज यांच्या प्रतिमेचे पूजन अमित भांबुरे, प्रा. अमृता भांबुरे, डॉ. ज्योती मुंडर्गी व नागराज मुंडर्गी यांच्या हस्ते, तर संत सावता माळी महाराज यांच्या प्रतिमेचे पूजन पांडुरंग किसन गदादे व विना गदादे यांच्या हस्ते करण्यात आले. कार्यक्रमांतर्गत संत नामदेव गाथा पारायण सोहळा आयोजित करण्यात आला होता. हे पारायण तब्बल १२ दिवस चालले असून त्याचे नेतृत्व ह. भ. प. मुरलीधर ढेकणे व हरिदास वनारसे यांनी केले.
ह. भ. प. नारायण महाराज यमगर (आळंदी) यांनी संत नामदेव महाराज यांच्या चरित्राचे भावस्पर्शी कथन केले. यानंतर पादुका पालखी काढून संपूर्ण ग्रामप्रदक्षिणा करण्यात आली. या दिंडी सोहळ्याचे आयोजन दिलीप हेंद्रे, नारायण हेंद्रे, विनायक हेंद्रे, अरुण हेंद्रे, हरिदास वनारसे व मुरलीधर ढेकणे यांनी अत्यंत श्रद्धेने व उत्साहात केले.
कार्यक्रमाची सांगता महाआरती व महाप्रसाद वाटपाने करण्यात आली. ही संपूर्ण पुण्यतिथी सोहळ्याची तयारी व आयोजन श्री विठ्ठल मंदिर संस्थेचे विश्वस्त ह. भ. प. बाळकृष्ण आरडे, यतीनभाई शहा, तसेच मंदिरातील भजनकरी व सेवेकरी यांनी संयुक्तरित्या केले होते.




