Pune District : चिंकारांच्या कळपांमुळे माळरानांना नवे सौंदर्य
Pune District : उजाड म्हणून ओळखली जाणारी ही माळराने आता निसर्गाच्या विविध रूपांनी बहरली आहेत. परिसरातील निसर्गरम्य वातावरण आणि चिंकारांचे कळप पाहण्यासाठी निसर्गप्रेमी तसेच छायाचित्रकारांची पावले या भागाकडे वळत आहेत.

आळेफाटा : जुन्नर तालुक्याच्या पूर्व भागातील आळे, राजुरी, आणे आणि नळावणे परिसरातील बोडकी माळराने सध्या पावसामुळे हिरवाईने नटली आहेत. हिरव्या गवताच्या झालरीत न्हालेल्या या माळरानांवर मुक्तपणे चरणार्या चिंकारांच्या कळपांमुळे परिसराच्या नैसर्गिक सौंदर्यात आणखी भर पडली आहे.
काही महिन्यांपूर्वी रखरखीत आणि उजाड भासणारे डोंगरउतार आता हिरवळीने व्यापले आहेत. या हिरव्या चार्यावर चिंकारांचे कळप मुक्तपणे चरताना दिसत आहेत. पहाटेच्या वेळी शांत वातावरणात पाच ते दहा चिंकारांचा कळप एकत्र चरताना दिसतो. त्यांची सावध हालचाल, चपळ अंगकाठी आणि वार्यासोबत डुलणार्या गवतामधील त्यांची उपस्थिती निसर्गप्रेमींचे लक्ष वेधून घेत आहे.
चिंकारांच्या अंगावरील रंग माळरानाच्या रंगाशी मिळताजुळता असल्याने मोकळ्या गवताळ प्रदेशात त्यांना नैसर्गिक संरक्षण मिळते. त्यामुळे बोडकी माळराने आणि गवताळ प्रदेश चिंकारांसाठी अनुकूल अधिवास ठरत आहेत. सध्या या परिसरात चिंकारांचे कळप मोठ्या संख्येने दिसून येत असल्याने वन्यजीवप्रेमींमध्येही उत्सुकता निर्माण झाली आहे. उजाड म्हणून ओळखली जाणारी ही माळराने आता निसर्गाच्या विविध रूपांनी बहरली आहेत. परिसरातील निसर्गरम्य वातावरण आणि चिंकारांचे कळप पाहण्यासाठी निसर्गप्रेमी तसेच छायाचित्रकारांची पावले या भागाकडे वळत आहेत. विशेषतः नळावणे परिसरातील माळराने वन्यजीव निरीक्षणासाठी आकर्षणाचे केंद्र ठरत आहेत.
सह्याद्रीच्या पर्वतरांगांच्या कुशीत वसलेल्या नळावणे परिसरात वनक्षेत्रासह शेतशिवारातही चिंकारांच्या कळपांचा वावर वाढला आहे. त्यामुळे हा परिसर जैवविविधतेच्या दृष्टीने महत्त्वाचा ठरत असून, वन्यजीवांचे संरक्षण आणि निसर्ग पर्यटनाला चालना देण्यासाठी भविष्यात नियोजनबद्ध उपाययोजना करण्याची गरज व्यक्त होत आहे.
संवर्धनासाठी नियोजनाची गरज
वन्यजीव अभ्यासकांच्या मते, चिंकारा मोकळ्या, कोरड्या आणि गवताळ प्रदेशात राहणे पसंत करतात. त्यामुळे नळावणे परिसरातील माळराने त्यांच्यासाठी अनुकूल अधिवास ठरत आहेत. चिंकारांना या भागात सुरक्षित वातावरण मिळत असल्याने त्यांचा वावर वाढल्याचे दिसून येत आहे.





