Henil Patel Bowling : कोण आहे हा हेनिल पटेल? ज्याच्या स्विंगसमोर अमेरिकेच्या निम्म्या संघाने टेकले गुडघे

Henil Patel Bowling in IND vs USA match : सहावेळचा विश्वविजेता भारतीय संघ १९ वर्षांखालील विश्वचषक स्पर्धेत सातवे जेतेपद पटकावण्यासाठी सज्ज झाला आहे. आज अमेरिकेविरुद्ध झालेल्या सामन्यात भारतीय गोलंदाजांनी शिस्तबद्ध मारा करत वर्चस्व गाजवले. विशेषतः वेगवान गोलंदाज हेनिल पटेलने आपल्या धारदार गोलंदाजीने अमेरिकेच्या फलंदाजीचे कंबरडे मोडले.
टॉस भारताच्या बाजूने, गोलंदाजीचा निर्णय सार्थ –
भारतीय कर्णधार आयुष म्हात्रेने नाणेफेक जिंकून प्रथम गोलंदाजी करण्याचा निर्णय घेतला. फॉर्मात असलेला फलंदाज वैभव सूर्यवंशी याची फटकेबाजी पाहण्यासाठी उत्सुक असलेल्या चाहत्यांना भारताच्या प्रथम फलंदाजी न करण्याच्या निर्णयामुळे थोडी निराशा झाली, मात्र गोलंदाजांनी ही कसर लवकरच भरून काढली. त्यांनी शानदार गोलंदाजी करत अमेरिकेच्या संघाला ३५.२ षटकांत १०७ धावांत गारद केले.
हेनिल पटेलचा ‘मॅजिक स्पेल’ –
𝗙𝗜𝗙𝗘𝗥!
Henil Patel shines bright in the #U19WorldCup opener against USA U19 🔥
Updates ▶️ https://t.co/AMFM5Bk4oI pic.twitter.com/artSUGSyAZ
— BCCI (@BCCI) January 15, 2026
गुजरातच्या १८ वर्षीय हेनिल पटेलने आपल्या निवडीचे सोने केले. त्याने डावाच्या दुसऱ्याच षटकात अमरिंदर गिलला (१) बाद करून भारताला पहिले यश मिळवून दिले. त्यानंतर साहिल गर्ग (१६) आणि अर्जुन महेश (१६) यांनी काही काळ झुंज दिली, पण दीपेश देवेंद्रनने ही जोडी फोडली.
यानंतर पुन्हा एकदा हेनिलचे वादळ आले. त्याने सेट झालेला फलंदाज अर्जुन महेश आणि अमेरिकेचा कर्णधार उत्कर्ष श्रीवास्तव (०) यांना लागोपाठ बाद करत अमेरिकेची अवस्था ४ बाद ३५ अशी दयनीय केली. खिलान पटेलने अमोघ अरेपल्लीला (३) बाद करून अमेरिकेचा पाचवा गडी टिपला. यानंतर काही वेळातच अमेरिकेचा संघ १०७ धावांत गारद झाला. ज्यामध्ये हेनिल पटेलने सर्वाधिक पाच फलंदाजांना तंबूचा रस्ता दाखवला.
हेही वाचा – Meg Lanning Record : मेग लॅनिंगचा ऐतिहासिक पराक्रम! डब्ल्यूपीएलमध्ये ‘ही’ कामगिरी करणारी ठरली तिसरी फलंदाज
कोण आहे हेनिल पटेल?
Innings Break!
Henil Patel’s brilliant figures of 5️⃣/1️⃣6️⃣ help India U19 restrict USA U19 to 107 👏
Over to our batters 🙌
Scorecard ▶️ https://t.co/AMFM5Bk4oI#U19WorldCup pic.twitter.com/Ro8Fy9Pkly
— BCCI (@BCCI) January 15, 2026
हेनिल पटेल हा गुजरातचा उदयोन्मुख वेगवान गोलंदाज आहे. चेंडू दोन्ही बाजूंनी स्विंग करण्याची कला आणि अचूक ‘लाईन-लेंथ’ ही त्याची वैशिष्ट्ये आहेत. यापूर्वी इंग्लंडविरुद्धची युवा कसोटी आणि ऑस्ट्रेलियाविरुद्धच्या वन-डे मालिकेत त्याने केलेल्या चमकदार कामगिरीमुळे त्याला विश्वचषक संघात स्थान मिळाले आहे.





