हृदयद्रावक! देवदर्शनासाठी गेलेल्या दाम्पत्यावर अस्वलाचा हल्ला, मृत्यूनंतरही केली मृतदेहाची विटंबना

पन्ना – मध्य प्रदेशातील पन्ना येथून एक हृदयद्रावक घटना समोर आली आहे. पन्ना येथील एका दाम्पत्यावर अस्वलाने हल्ला करून दोघांनाही जंगलात नेले. यानंतर अस्वलाने जखमी जोडप्याचे जिवंतपणी लचके तोडण्यास सुरुवात केली.
गंभीर जखमी झाल्याने अखेर या दाम्पत्याचा मृत्यू झाला. दरम्यान, या घटनेनंतर स्थानिक नागरिकांकडून प्रचंड संताप व्यक्त करण्यात येत आहे. ही घटना पन्ना जिल्ह्यातील कोतवाली पोलीस ठाण्याच्या हद्दीतील वॉर्ड क्रमांक 16 मधील आहे.
मुकेश राय (50 वर्षे) आणि त्यांची पत्नी गुडिया (45 वर्षे) हे पन्ना शहरालगत असलेल्या खेरमाई माता मंदिरात दर्शनासाठी गेले होते. दरम्यान, मंदिराजवळ अस्वलाने दाम्पत्यावर हल्ला केला. अस्वलाने त्या जोडप्याला उचलले आणि जंगलात नेले आणि त्यांचे लचके तोडून खाण्यासा सुरुवात केली. यामुळे या दाम्पत्याचा मृत्यू झाला.
दाम्पत्याच्या मृत्यूनंतर 3-4 तासांनंतरही अस्वलाने मृतदेहांची विटंबना सुरूच ठेवली. अस्वल मृतदेहांवरून बसून होते. तर माहिती देऊनही वन कर्मचारी न पोहोचल्याने नागरिकांच्या संतापाचा भडका उडाला. अखेर, बऱ्याच वेळानंतर पन्ना व्याघ्र प्रकल्पाचे पथक घटनास्थळी पोहोचले आणि पथकाने अस्वलाला बेशुद्ध करून पिंजऱ्यात बंद केले.
अस्वल आता जंगलात राहण्यास योग्य नाही, त्यामुळे त्याला प्राणीसंग्रहालयात पाठवण्यात येणार असल्याचे वनविभागाच्या पथकाचे म्हणणे आहे.
अस्वलाला पकडल्यानंतर उत्तर वन विभागाचे डीएफओ गौरव शर्मा यांनी सांगितलं की, सरकारच्या नियमांनुसार मृतांच्या आश्रितांना 4-4 लाख रुपयांची आर्थिक मदत दिली जाईल. यावेळी संतप्त नातेवाइकांनी काही काळ गोंधळ घातला आणि गरीब कुटुंबाला आर्थिक मदतीसोबतच कुटुंबातील एकाला सरकारी नोकरी देण्याची मागणीही केली.



