सांगवीतील ‘त्या’ बेपत्ता तरूणीचा लोहगड पायथ्याशी आढळला मृतदेह

पवन मावळ : मंगळवारपासून (दि.18) बेपत्ता असलेल्या सांगवी (पिंपरी-चिंचवड) येथील 21 वर्षीय मानसी प्रशांत गोविंदपुरकर ह्या तरूणीचा मृतदेह किल्ले लोहगडाच्या पायथ्याशी आढळून आला आहे. गुरुवारी (दि.20) शिवदुर्ग रेस्कू टीमच्या सदस्यांनी सदर बेपत्ता तरूणीचा शोध घेतला असता गडपायथ्याशी झाडाझुडपात तिचा मृतदेह आढळून आला.
सांगवी मधील मानसी गोविंदपुरकर ही तरूणी मंगळवारी घरातून कॉलेजला जात असल्याचे सांगून किल्ले लोहगड परिसरात आली होती. मंगळवारी सकाळी नऊच्या सुमारास गडावर एका टॅक्सीतून ती एकटीच आल्याचे व गडावर जाताना तिकीट काऊंटर वरील सीटीटीव्हीत दिसल्याचे पोलीस तपासात समोर आले. त्यानंतर तरूणीचे नातेवाईक व शिवदुर्ग रेस्कू टीमच्या सदस्यांनी तिचा गडावर, गडावरील टाके व गड पायथ्याशी कसून शोध घेतला.
शोध मोहीम सुरू असताना घेरेवाडीकडील बाजूस असणाऱ्या नवग्रह मंदिराच्या जवळील झाडाझुडपात तिचा मृतदेह आढळून आला. शिवदुर्गच्या सदस्यांनी अथक प्रयत्नातून तरूणीचा मृतदेह बाहेर काढला व पोलिसांच्या स्वाधीन केला. गडावरून पडून तिचा मृत्यू झाला असावा असा प्राथमिक अंदाज आहे, परंतु अधिक तपास लोणावळा ग्रामीण पोलीस करीत आहेत.
शिवदुर्ग रेस्कू टीमच्या सचिन गायकवाड, महेश मसने, सुनिल गायकवाड, वैष्णवी भांगरे, अमोल सुतार, करण वरे, सागर कुंभार, सागर दळवी, मयुर दळवी, कुणाल कडू, आयुष वर्तक व लोणावळा ग्रामीण पोलीस, स्थानिक नागरिक यांनी शोधकार्यात मदत केली.





