Utarakhand : उत्तरकाशीत आभाळ फाटलं..! 20 सेकंदात सगळं उद्धवस्त, 60 लोक बेपत्ता
Cloud Burst in Uttarakhand : उत्तरकाशीमध्ये ढगफुटीमुळे मोठे नुकसान झाले आहे. धारली खीर गड येथे पाण्याची पातळी वाढल्याने धारली बाजारपेठ परिसरात हे नुकसान झाले आहे. सैन्य, पोलिस आणि एसडीआरएफची टीम भटवाडी येथे पाठवण्यात आली आहे. धारली गावावर ढगफुटी झाल्याने धारली बाजारपेठेसह संपूर्ण गाव प्रभावित झाले आहे. यामध्ये ५० ते ६० लोक बेपत्ता असल्याची माहिती आहे.
मिळालेल्या माहितीनुसार, उत्तराखंडमधील धारली गावात ही विध्वंस घडली आहे. येथे ढगफुटीमुळे नदीकाठावर अचानक मोठा पूर आला. त्यामुळे नदीकाठावर बांधलेली घरे माचीच्या काड्यांसारखी वाहून गेली.
गंगोत्री धामला जाणाऱ्या मार्गावर धाराली हा एक महत्त्वाचा थांबा आहे. धाराली येथील खीर गंगा नदीत ढगफुटी झाल्यामुळे हे विनाशकारी दृश्य पाहायला मिळाल्याचे सांगण्यात येत आहे. यामध्ये ५० ते ६० लोक बेपत्ता असल्याचे सांगण्यात येत आहे. नदीकाठावर अचानक आलेल्या पुरामुळे डझनभर हॉटेल्स आणि होमस्टेचे नुकसान झाले आहे. त्यात अनेक कामगार गाडले जाण्याची शक्यता आहे.
ढगफुटी ही एक नैसर्गिक प्रक्रिया आहे, परंतु नदीकाठावर असे बांधकाम विनाशाला आमंत्रण देत आहे. पाणी येताच खूप आरडाओरडा झाला, पण लोकांना बाहेर पडण्याची संधी मिळाली नाही. पुरासोबतच मोठे दगड आणि लाकडेही वाहून गेली आणि त्यांचा फटका बसल्याने अनेक लोक जखमी होण्याची भीती आहे.
केंद्रीय मंत्री अजय टमटा म्हणाले की, ढगफुटीमुळे हे नुकसान झाले आहे. ही मोठी घटना उत्तराखंडच्या धाराली भागात घडली आहे. उत्तराखंडचे मुख्यमंत्री पुष्कर सिंह धामी म्हणाले की, मोठ्या प्रमाणात बचावकार्य युद्धपातळीवर सुरू आहे. बचावकार्यात एनडीआरएफ-एसडीआरएफ तैनात करण्यात आले आहे.
धारलीजवळ गंगोत्रीचे हिवाळी निवासस्थान आहे. पर्वतांमधून वाहणाऱ्या नदीला खीर गंगा म्हणतात. ही संपूर्ण आपत्ती धारली गावावर आली आहे. उत्तराखंडचे माजी मुख्यमंत्री हरीश रावत म्हणतात की हा संपूर्ण हिमालयीन प्रदेश धोक्याच्या विळख्यात आहे. अशा सततच्या नैसर्गिक आपत्ती संकटाचे कारण आहेत. राष्ट्रीय पातळीवर याबद्दल विचार करण्याची गरज आहे.





