Satara : आझादपूरमध्ये विहिरीत पडलेल्या युवकाचा मृतदेह बाहेर काढला

कोरेगाव : आझादपूर, ता. कोरेगाव येथील गुजरडोह नावाच्या शिवारातील एका विहिरीवर काम करणारा २२ वर्षीय ठेकेदार युवक हा लोखंडी प्लेट आणण्यासाठी विहिरीच्या कडेला गेला असता सायंकाळी सहा वाजण्याच्या सुमारास पाय घसरून विहिरीत पडला होता. तब्बल १७ तासानंतर मंगळवारी सकाळी सव्वा अकरा वाजण्याची सुमारास सातारच्या शिवेंद्रसिंहराजे ट्रेकर्सने कष्ट घेत राबविलेल्या मोहिमेत विलास अशोक चव्हाण या २२ वर्षीय ठेकेदाराचा मृतदेह विहिरीतून बाहेर काढण्यात आला. मृतदेह पाहताच नातेवाईकांनी टाहो फोडला. यावेळी संपूर्ण वातावरण शोकाकूल झाले होते.
विजापूर जिल्ह्यातील विलास अशोक चव्हाण हे आझादपूर येथे विहिरीवर आरसीसी रिंग टाकण्याचे काम करत होते. यादरम्यान सोमवारी सायंकाळी लोखंडी प्लेट आणण्यास गेले असता तोल जाऊन ते विहिरीत पडले होते. विहीर मालकासह गावातील युवकांनी तातडीने पाण्यात उड्या मारून चव्हाण यांचा शोध घेतला, मात्र ते सापडू शकले नव्हते.
सायंकाळपासून रात्री उशिरापर्यंत ग्रामस्थ व युवक त्यांचा शोध घेत होते, तरी देखील चव्हाण सापडू शकले नाहीत. रात्री अंधारात मोहीम थांबविण्यात आली.
पोलिसांनी ग्रामस्थांच्या सहकार्याने सातारा येथील शिवेंद्रसिंहराजे ट्रेकर्सच्या पथकाला पाचारण करण्याचा निर्णय घेतला. विहिरीचे पाणी गढूळ असल्याने आणि रात्री शोध घेता येणार नसल्याने ट्रेकर्स सकाळी सव्वा दहाच्या दरम्यान आझादपूर येथे दाखल झाले. तोपर्यंत विहिरीच्या परिसरात पंचक्रोशीतील ग्रामस्थ जमले होते. कर्नाटकातील विजापूर जिल्ह्यातील चव्हाण यांचे नातलग आले होते. ग्रामस्थांनी जिल्हाधिकारी संतोष पाटील यांना संपर्क साधून तातडीने चव्हाण यांचा मृतदेह विहिरीबाहेर काढण्याची विनंती केली होती. जिल्हाधिकारी संतोष पाटील यंत्रणा गतिमान करून अधिकारी व कर्मचाऱ्यांना घटनास्थळी पाठवून दिले. पोलीस फौजफाटा देखील तैनात करण्यात आला होता.
शिवेंद्रसिंहराजे ट्रेकर्सने दोरखंडाच्या साह्याने शोध मोहीम राबवली आणि दुपारी सव्वा अकरा वाजण्याच्या सुमारास चव्हाण यांचा मृतदेह विहिरीतून बाहेर काढला. मृतदेह पाहून चव्हाण कुटुंबीयांनी टाहो फोडला. नातेवाईकांच्या आक्रोशाने परिसर गहिवरला. चव्हाण यांचा मृतदेह कोरेगाव उपजिल्हा रुग्णालयात शवविच्छेदनासाठी नेण्यात आला. तेथील सोपस्कार पूर्ण करून मृतदेह कर्नाटक राज्यात विजापूर जिल्ह्यात अंत्यविधीसाठी नेण्यात येणार आहे.





