Pune District : बारामती लोकसभा मतदारसंघातील गावागावांत पाहोचणार आरोग्यसेवा
Pune District : या उपक्रमाचा शुभारंभ आज संस्थेचे चेअरमन राजेंद्र पवार व संस्थेच्या विश्वस्त सुनंदा पवार यांच्या हस्ते करण्यात आले.

बारामती : बारामतीची अॅग्रिकल्चरल डेव्हलपमेंट ट्रस्ट ही संस्था गेली पाच दशके ग्रामीण भागाचा शाश्वत विकास या माध्यमातून कृषी, शिक्षण, जलसंधारण, महिला प्रशिक्षणे, महिला बचत गट, महिला आरोग्य, महिला सबलीकरण अशा वेगवेगळ्या क्षेत्रामधे कार्य करीत आहे. याच कार्याचा एक भाग म्हणजे ग्रामीण महिला व त्यांचे आरोग्य या अनुषंगाने ग्रामीण भागातील नागरिकांना त्यांच्या दारातच आरोग्यसेवा उपलब्ध करून देण्याचा उपक्रम संस्थेने १९८० च्या दरम्यान संस्थेच्या वतीने राबविण्यात येत होता, आज या उपक्रमास ४५ वर्ष पूर्ण झाली.
आता परत नव्याने विस्तारित स्वरुपात ॲग्रीकल्चरल डेव्हलपमेंट ट्रस्ट, बारामती यांच्या वतीने संस्थेचे संस्थापक चेअरमन कै.अप्पासाहेब पवार यांच्या स्मृतीप्रित्यर्थ बारामती लोकसभा मतदार संघात गांव व वाडीवस्ती या ठिकाणी मोबाईल ॲम्ब्युलन्स व्हॅनद्वारे नागरिकांची मोफत आरोग्य तपासणी उपक्रम राबविण्यात येणार आहे. अशी माहिती संस्थेचे चेअरमन राजेंद्र दादा पवार व संस्थेच्या विश्वस्त सुनंदा पवार यांनी दिली.
या उपक्रमाचा शुभारंभ आज संस्थेचे चेअरमन राजेंद्र पवार व संस्थेच्या विश्वस्त सुनंदा पवार यांच्या हस्ते करण्यात आले. यावेळी बोलताना राजेंद्र पवार यांनी ग्रामीण भागातील सर्वसामान्य प्रत्येक नागरिकापर्यंत आरोग्यसेवा पोहोचविण्याचा संस्थेचा संकल्प व्यक्त केला. आरोग्य सेवांचा लाभ शेवटच्या घटकापर्यंत पोहोचवण्यासाठी हा उपक्रम महत्त्वपूर्ण ठरेल, असा विश्वास त्यांनी व्यक्त केला.
संस्थेच्या विश्वस्त सुनंदा पवार यांनी बोलताना या मोबाईल आरोग्यसेवा उपक्रमांतर्गत गावांमधील सर्व नागरिकांची प्राथमिक आरोग्य तपासणी मोफत करण्यात येणार असून आवश्यकतेनुसार त्यांना औषधांचेही वितरण करण्यात येणार आहे. विशेषतः ग्रामीण भागातील वाडीवस्ती, दुर्गमभाग आरोग्य सुविधांपासून वंचित असलेल्या नागरिकांना या उपक्रमाचा मोठा लाभ होणार आहे. मोबाईल ॲम्ब्युलन्स व्हॅनद्वारे रक्तदाब, रक्तातील साखर, हिमोग्लोबिन, तापमान तसेच इतर प्राथमिक आरोग्य तपासण्या करण्यात येतील. आरोग्यविषयक मार्गदर्शनासह आवश्यक रुग्णांना पुढील उपचारांसाठी योग्य सल्लाही दिला जाणार आहे.
उद्घाटन प्रसंगी ॲग्रीकल्चरल डेव्हलपमेंट ट्रस्टचे पदाधिकारी, अधिकारी, वैद्यकीय कर्मचारी तसेच आरोग्य सेवक मोठ्या संख्येने उपस्थित होते.या उपक्रमाचे प्रास्ताविक संस्थेचे प्रकल्प समन्वयक सचिन खलाटे यांनी केले. यावेळी उपस्थित संस्थेचे मुख्य कार्यकारी अधिकारी निलेश नलावडे, समन्वयक प्रशांत तनपुरे, आर.बी.देशमुख, सागर शिंदे, डॉ.चैतन्य घोडके,डॉ.राहुल सरोदे,विना जाधव,डॉ.नवनाथ म्हस्के,डॉ.शंकर भडांगे, आकाश सावळकर महिला नागरिक,नर्सिंग विद्यार्थी उपस्थित होते.





