Pune District : भीमाशंकर आंदोलकांची प्रकृती खालावली
Pune District : आदिवासींच्या वनउपजाला कायदेशीर किमान आधारभूत किंमत लागू करून त्यासाठी बाजार समित्या स्थापन करा याही मागण्या केल्या आहेत 'जल, जंगल, जमीन आमच्या हक्काची' अशा घोषणा आंदोलनाच्या ठिकाणी भेटी देणारे देत आहेत.

रांजणी : शिवभूमी सह्याद्री बचाव समन्वय समिती’च्या वतीने भीमाशंकर येथे बेमुदत अमरण उपोषण करणाऱ्या आंदोलकांचे प्रकृती खालावल्याने त्यांना वैद्यकीय उपचार घेण्याची विनंती तळेघर येथील प्राथमिक आरोग्य केंद्राच्या वैद्यकीय अधिकाऱ्यांनी केली आहे. सह्याद्रीतील २३ विनाशकारी प्रकल्पांसह भीमाशंकर कर्जत येथील प्रस्तावित टोरेंट प्रकल्प रद्द करण्याची प्रमुख मागणी आंदोलकांनी केली आहे. या उपोषणात अनिल तिटकारे, नारायण हिले, शरद ठोकळ, सौरभ बोंडे आणि विजय केंगले सहभागी झाले.
आंदोलकांच्या प्रमुख मागण्यांमध्ये सह्याद्रीतील २३ प्रकल्प आणि भीमाशंकरमधील टोरेंट प्रकल्प रद्द करणे, बेकायदेशीर जंगलतोड करणाऱ्या संबंधित अधिकाऱ्यांवर गुन्हे दाखल करणे, पश्चिम घाटातील इको सेन्सिटिव्ह झोन आणि इकोलॉजिकली सेन्सिटिव्ह एरिया संदर्भातील कार्यवाही रद्द करणे, तसेच स्थानिक आदिवासींच्या संमतीशिवाय कोणतेही निर्णय घेऊ नयेत, पेसा कायद्याची कठोर अंमलबजावणी करून ग्रामसभेचे अधिकार डावलणाऱ्या अधिकाऱ्यांवर कारवाई करावी, आदिवासी भागातील धरणांमधील पाणी स्थानिकांना मिळावे, वनक्षेत्रातील गौण खनिजांची बेकायदेशीर वाहतूक व तस्करी थांबवावी.
आदिवासींच्या वनउपजाला कायदेशीर किमान आधारभूत किंमत लागू करून त्यासाठी बाजार समित्या स्थापन करा याही मागण्या केल्या आहेत ‘जल, जंगल, जमीन आमच्या हक्काची’ अशा घोषणा आंदोलनाच्या ठिकाणी भेटी देणारे देत आहेत. तर राज्यातील असंख्य भाविक या आंदोलनाला पाठिंबा देत होते.
खेड तालुका काँग्रेस पक्षाचे अध्यक्ष चंद्रकांत गोरे, खेड काँग्रेसचे ज्येष्ठ नेते जमीर काझी, अध्यक्ष अशोकआप्पा काळे, किसान काँग्रेसचे अध्यक्ष बाळासाहेब इंदोरे व युवक अध्यक्ष महेंद्र शिंदे, ॲड. राजेंद्र बेंडे यांनी उपोषणस्थळी भेट देऊन आंदोलकांशी संवाद साधत मार्गदर्शन केले. या बेमुदत उपोषणाची प्रशासन काय दखल घेते. आंदोलकांच्या मागण्यांवर काय निर्णय घेते, याकडे लक्ष वनप्रेमींचे लागले आहे. या ठिकाणी घोडेगाव पोलीस स्टेशनचे कर्मचारी यांनी बंदोबस्त ठेवला आहे.
मान्यवरांकडून विनंती
शिरूरचे खासदार डाॅ. अमोल कोल्हे यांनी दिल्ली येथून भ्रमणध्वनीवरून संपर्क साधून तर पुणे जिल्हा राष्ट्रवादी शरद पवार गटाचे जिल्हाध्यक्ष देवदत्त निकम यांनी उपोषणकर्त्यांना प्रत्यक्ष भेटून आंदोलन मागे घेण्याची विनंती केली. तर, आंबेगाव तालुक्याचे तहसीलदार व घोडेगाव पोलीस निरीक्षक आज सायंकाळी भेट देणार असल्याचे आंदोलन करताना सांगितले.





