Hasan Mushrif Gokul Election : ‘गोकुळ’च्या विजयानंतर हसन मुश्रीफ यांचं मोठं विधान; ‘अमूल’च नाव घेत स्पष्टच म्हणाले….
या निकालाने सतेज पाटील यांना मोठा राजकीय धक्का बसला असून महायुतीच्या गोटात जल्लोष सुरू झाला आहे. या विजयानंतर मंत्री हसन मुश्रीफ यांनी जल्लोष करत सतेज पाटील यांच्यावर निशाणा साधला आहे.

Hasan Mushrif Gokul Election : कोल्हापूर जिल्ह्याच्या राजकारणात प्रतिष्ठेची बनलेली गोकुळ दूध संघाच्या अध्यक्षपदाची निवडणूक अखेर महायुतीने जिंकली आहे. महायुतीचे उमेदवार राजेश पाटील यांनी सतेज पाटील यांच्या समविचारी आघाडीचे उमेदवार शशिकांत चुयेकर यांचा 16 विरुद्ध 13 मतांनी पराभव केला.
दरम्यान, या निकालाने सतेज पाटील यांना मोठा राजकीय धक्का बसला असून महायुतीच्या गोटात जल्लोष सुरू झाला आहे. या विजयानंतर मंत्री हसन मुश्रीफ यांनी जल्लोष करत सतेज पाटील यांच्यावर निशाणा साधला आहे.
हसन मुश्रीफ नेमकं काय म्हणाले?
“गोकुळच्या निवडणुकीत दूध संघ अमुलला विकण्याचा घाट घालण्यात येत आहे असा खोटा प्रचार करण्यात आला. मात्र आज आम्ही सांगतो रक्ताचा शेवटचा थेंब असेपर्यंत आम्ही अमुल वगेरे काही करणार नाही तज्ज्ञ संचालकांनी त्यांच्या सददविवेक बुद्धीने मतदान केलं आहे.
सतेज पाटील यांनी त्यांची पुढील रणनिती आखावी, त्यांचा मार्ग मोकळा आहे. कोर्टामध्ये सुनावणी चालू राहील. आमचे संचालक मंडळ दूध उत्पादकांना न्याय देईल,” असं म्हणत हसन मुश्रीफ यांनी सतेज पाटील यांना थेट इशाराही दिला आहे.
राजेश पाटील यांची पहिली प्रतिक्रिया….
माध्यमांशी बोलताना ते म्हणाले की, “मी प्रथमतः सर्व दुध उत्पादक शेतकऱ्यांचे आभार मानतो. माझ्यावर दूध संघाची जबाबदारी सोपवली आहे. मी सर्वांसाठी हिताचं काम करेन. गोकुळचं वैभव वाढवण्यासाठी मी प्रयत्न करेन. गेल्या वर्षभरातला तोटा भरून काढण्यासाठी नियोजन करु. कोर्टातून आदेश प्राप्त झाल्यानंतर निवड प्रक्रिया पूर्ण झाली.
निवडणुकीच्यावेळी विरोधक होतो आता त्यांनीही सर्वानी दूध उत्पादक शेतकऱ्यांच्या हिताचे निर्णय करुयात. त्यासाठी हातात हात घेऊन काम करुयात, अशी अपेक्षा आहे. झालेलं विसरुन एकदिलान काम करुयात. पुढील पाच वर्ष बाकीचं सर्व राजकारण बाजूला ठेऊयात. शेतकऱ्यांच्या हितासाठी काम करु, ६२ वर्षांनंतर चंदगडसारख्या भागाला नेतृत्त्व मिळालं, अशी प्रतिक्रिया राजेश पाटील यांनी यावेळी दिली आहे.






