Gokul Chairman Election 2026 : अजितदादांच्या विश्वासू नेत्याची गोकुळवर सत्ता.! राजेश पाटील अध्यक्षपदी; सतेज पाटलांना मोठा धक्का
एकेकाळी अजित पवार यांनी राजेश पाटील यांना ‘माझा उजवा हात’ असे संबोधत त्यांच्या पराभवाची जाहीर खंत व्यक्त केली होती. आता त्याच विश्वासू नेत्याने गोकुळच्या सत्तेवर आपले नाव कोरले आहे.

Gokul Chairman Election 2026 : कोल्हापूर जिल्ह्याच्या राजकारणात प्रतिष्ठेची बनलेली गोकुळ दूध संघाच्या अध्यक्षपदाची निवडणूक अखेर महायुतीने जिंकली आहे. महायुतीचे उमेदवार राजेश पाटील यांनी सतेज पाटील यांच्या समविचारी आघाडीचे उमेदवार शशिकांत चुयेकर यांचा 16 विरुद्ध 13 मतांनी पराभव केला. या निकालाने सतेज पाटील यांना मोठा राजकीय धक्का बसला असून महायुतीच्या गोटात जल्लोष सुरू झाला आहे.
विशेष म्हणजे, एकेकाळी अजित पवार यांनी राजेश पाटील यांना ‘माझा उजवा हात’ असे संबोधत त्यांच्या पराभवाची जाहीर खंत व्यक्त केली होती. आता त्याच विश्वासू नेत्याने गोकुळच्या सत्तेवर आपले नाव कोरले आहे. त्यामुळे या विजयाला केवळ सहकारी संस्थेच्या निवडणुकीपुरते मर्यादित न ठेवता कोल्हापूरच्या राजकारणातील महत्त्वाची घडामोड मानली जात आहे.
सतेज पाटलांचे संख्याबळ असूनही बाजी महायुतीची!
गोकुळच्या अध्यक्षपदाची निवडणूक सुरुवातीपासूनच अत्यंत चुरशीची बनली होती. संचालक मंडळात समविचारी आघाडीचे 13, तर महायुतीचे 12 संचालक होते. त्यामुळे सतेज पाटील यांच्या नेतृत्वाखालील आघाडीचे पारडे जड असल्याचे चित्र होते. मात्र, शासननियुक्त चार संचालकांच्या मतदानाच्या अधिकारामुळे संपूर्ण निवडणुकीचे गणित बदलले.
उच्च न्यायालयाच्या औरंगाबाद खंडपीठाच्या आदेशानंतर 10 नोव्हेंबर रोजी ही निवडणूक पार पडली. सुरुवातीलाच समविचारी आघाडीच्या संचालकांनी शासननियुक्त सदस्यांच्या मतदानाच्या अधिकारावर आक्षेप घेतला. निवडून न आलेल्या सदस्यांना मतदानाचा अधिकार कसा मिळू शकतो, असा सवाल उपस्थित करण्यात आला. मात्र, संबंधित सरकारी अध्यादेश, नियम आणि न्यायालयीन आदेशांचा दाखला देत हा आक्षेप फेटाळण्यात आला.
त्यानंतर प्रत्यक्ष निवडणूक प्रक्रिया पार पडली. अखेर राजेश पाटील यांनी 16 मते मिळवत बाजी मारली, तर शशिकांत चुयेकर यांना 13 मतांवर समाधान मानावे लागले. त्यामुळे महायुतीने गोकुळच्या अध्यक्षपदावर आपले वर्चस्व सिद्ध केले.
कोण आहेत राजेश पाटील?
राजेश नरसिंगराव पाटील हे राष्ट्रवादी काँग्रेसचे माजी आमदार असून त्यांनी कोल्हापूर जिल्ह्यातील चंदगड विधानसभा मतदारसंघाचे प्रतिनिधित्व केले आहे. त्यांचे वडील नरसिंग गुरुनाथ पाटील हेसुद्धा आमदार होते. त्यामुळे राजेश पाटील यांना राजकारणाचा वारसा घरातूनच मिळाला.
2019 च्या विधानसभा निवडणुकीत ते चंदगडमधून आमदार म्हणून निवडून आले होते. राष्ट्रवादी काँग्रेसचे ज्येष्ठ नेते हसन मुश्रीफ आणि दिवंगत अजित पवार यांचे विश्वासू सहकारी म्हणून त्यांची ओळख होती. मात्र, 2024 च्या विधानसभा निवडणुकीत भाजपचे बंडखोर उमेदवार शिवाजी पाटील यांनी त्यांचा पराभव केला.
हा पराभव अजित पवार यांच्या चांगलाच जिव्हारी लागला होता. आता विधानसभा निवडणुकीतील पराभवानंतर राजेश पाटील यांनी गोकुळच्या अध्यक्षपदावर मिळवलेला विजय त्यांच्या राजकीय पुनरागमनाच्या दृष्टीने महत्त्वाचा मानला जात आहे.
‘माझा उजवा हात पराभूत झाला’; अजितदादांची ती भावनिक आठवण पुन्हा चर्चेत!
राजेश पाटील यांच्या विजयाची चर्चा सुरू होताच अजित पवार यांच्या एका जुन्या भाषणाची आठवण पुन्हा चर्चेत आली आहे. मे 2025 मध्ये चंदगड परिसरातील नागरी सत्कार कार्यक्रमात बोलताना अजितदादांनी राजेश पाटील यांच्या विधानसभा निवडणुकीतील पराभवाची खंत व्यक्त केली होती.
‘माझा उजवा हात राजेश पाटील पराभूत झाला आहे. त्यामुळे मी फेटा बांधला नाही. आमचा गड महाराष्ट्रात आला, पण आमचा सिंह गेला,’ अशा शब्दांत त्यांनी आपल्या भावना व्यक्त केल्या होत्या. पुढे त्यांनी कार्यकर्त्यांना आवाहन करत राजेश पाटील यांना पुन्हा निवडून आणा, त्यानंतर तुम्ही सांगाल तेवढे फेटे बांधेन, असेही म्हटले होते. अजितदादांच्या या वक्तव्यामुळे राजेश पाटील भावुक झाले होते.
‘अजितदादा मुख्यमंत्री होईपर्यंत फेटा बांधणार नाही’; राजेश पाटलांची प्रतिज्ञाही चर्चेत!
राजेश पाटील यांच्याशी संबंधित आणखी एका प्रतिज्ञेची चर्चा राजकीय वर्तुळात होत आहे. अजित पवार मुख्यमंत्री होईपर्यंत आपण फेटा बांधणार नाही, असा निर्धार त्यांनी केला होता. त्यामुळे अजितदादांशी असलेले त्यांचे राजकीय आणि भावनिक नाते किती घट्ट होते, हे अधोरेखित होते.
आज गोकुळच्या अध्यक्षपदी निवड झाल्यानंतर त्यांच्या या जुन्या विधानांची पुन्हा आठवण काढली जात आहे. अजितदादांच्या विश्वासातील नेत्याला मिळालेली ही मोठी राजकीय संधी असल्याची चर्चा कार्यकर्त्यांमध्ये सुरू आहे.





