”अभिषेकदादांनी मरणोत्तर भाजपात प्रवेश केलाय का?” तेजस्वी घोसाळकर यांच्या पोस्टरवर पतीच्या फोटोला ठाकरे सेनेचा विरोध

Tejashwi Ghosalkar : ऐन महापालिका निवडणुकीच्या तोंडावर उद्धवसेनेच्या निष्ठावन समजल्या जाणाऱ्या तेजस्वी घोसळकर यांनी ठाकरे गटाला जय महाराष्ट्र करत भाजपमध्ये जाहीर पक्ष प्रवेश केला. त्यामुळे दहिसरमधील स्थानिक राजकारणात मोठी खळबळ उडाली होती. येत्या काही दिवसांवर महापालिका निवडणुका होणार आहेत. त्यामुळे हालचालींना वेग आला असून तेजस्वी घोसाळकर या महापालिका निवडणूक लढण्यासाठी इच्छूक आहेत. त्यांनी प्रचारही सुरू केला आहे. पण त्यांच्या भाजप प्रवेशानंतर ठाकरे गटाच्या पदाधिकाऱ्यांमध्ये नाराजी पसरली असून, सोशल मीडियावर संतापाची लाट उसळली आहे. यामुळे दहिसरचे राजकारण चांगलेच तापले आहे.
राज्य निवडणूक आयोगाकडून महापालिका निवडणुकीच्या कार्यक्रमाची घोषणा करण्यापूर्वी महापालिका निवडणुकीचे आरक्षण जाहीर झाले होते. तेजस्वी घोसाळकर ज्या वार्डमधून निवडणुकीसाठी इच्छूक होत्या, त्या वार्डवर ओबीसी आरक्षण पडले. त्यानंतर त्यांनी एक सोशल मीडियावर पोस्ट शेअर केली होती. आता त्या भाजपमध्ये असून त्यांनी प्रभाग क्रमांक २ मधून निवडणूक लढविण्यास इच्छूक असून, त्यांनी प्रचाराला देखील सुरूवात केली आहे. मात्र, त्यांच्या प्रचाराच्या पोस्टरवर ठाकरे गटाचे नेते त्यांचे दिवंगत पती अभिषेक घोसाळकर यांचे छायाचित्र वापरण्यात आल्याने शिवसैनिकांमध्ये तीव्र नाराजी पसरली असून, ती सोशल मीडियावर उफाळून आली आहे.
अभिषेक घोसाळकर हे ठाकरे गटाचे निष्ठावान मानले जात असताना त्यांच्या छायाचित्राचा भाजपच्या प्रचारासाठी वापर केला जात असल्याचा आरोप शिवसैनिकांकडून करण्यात येत आहे. यावर शिवसैनिकांनी संतप्त प्रतिक्रिया सोशल मीडियाच्या माध्यमातून व्यक्त केल्या आहेत. “आणि अभिषेक भाऊ जर आज या ठिकाणी जर असते तर तुम्हाला हा निर्णय घेतला देऊ नसता लक्षात ठेवा,” अशा स्वरुपाच्या काही प्रतिक्रिया सोशल मीडियावर देण्यात आल्या आहेत. यामुळे आता राजकारण आणखी तापण्याची चिन्हे आहेत.
अभिषेक घोसाळकरांसोबत काय घडलं होतं?
८ फेब्रुवारी २०२४ या दिवशी शिवसेना ठाकरे गटाचे माजी नगरसेवकर अभिषेक घोसाळकर यांच्यावर गोळीबार करत त्यांची हत्या करण्यात आली होती. मॉरिस नावाच्या एका माणसाने त्यांच्यावर चार ते पाच गोळ्या झाडल्या होत्या. विशेष म्हणजे हे सारे मॉरिसने फेसबुक लाइव्हवेळी केले होते. या घटनेनंतर राज्यात एकच खळबळ उडाली होती.
तेजस्वनी घोसाळकर यांनी १५ डिसेंबर या दिवशी ठाकरेंची साथ सोडली. त्या माजी आमदार आणि शिवसेनेचे उपनेते विनोद घोसाळकर यांच्या सून आहेत. तर दिवंगत ठाकरे गटाचे माजी नगरसेवक अभिषेक घोसाळकर यांच्या पत्नी आहेत. तेजस्वी घोसाळकर यांच्या भाजप प्रवेशानंतर मागील काही महिन्यात दहिसर–मागाठाणे परिसरात उद्धव ठाकरे यांच्या पक्षाची संघटनात्मक ताकद लक्षणीयरीत्या घटल्याची चर्चा सुरू झाली आहे.





