Kachchh Earthquake। गुजरातमधील कच्छ परिसरात आज पहाटे भूकंपाचे धक्का जाणवले आहेत. कच्छ आणि परिसरात झालेल्या भूकंपाची तीव्रता ४.४ रिश्टर स्केल इतकी होती. याबाबतची माहिती राष्ट्रीय भूकंपशास्त्र विभागाने दिलीय. भूकंपाचे धक्के कच्छ परिसरात जाणवले. सुदैवाने आतापर्यंत कोणतीही जीवितहानी किंवा मालमत्तेच्या नुकसानीची अधिकृत माहिती समोर आलेली नाही. भूकंपानंतर काही काळ नागरिकांमध्ये भीतीचं वातावरण निर्माण झालं होतं. प्रशासनाकडून परिस्थितीवर लक्ष ठेवले जात असून नागरिकांना घाबरू नये, असं आवाहन करण्यात आलंय. भूकंपाचे केंद्र कच्छच्या पृष्ठभागापासून १० किलोमीटर खाली नोंदवले गेले. या भूकंपामुळे पहाटे झोपलेल्या लोकांना जाग आली आणि ते घाबरले. भूकंपाचे धक्के काही सेकंदांसाठीच जाणवले आणि काही जण घराबाहेर पळून गेले. तर काहींना पंखे, बेड आणि इतर हलक्या वस्तूही हादरल्याचे जाणवले. भरूचमध्ये यापूर्वी जमीन हादरली Kachchh Earthquake। पाच दिवसांपूर्वी, २० डिसेंबर रोजी, भरूच जिल्ह्यात पहाटे ४:५६ वाजता सौम्य भूकंपाचा धक्का जाणवला. भरूच आणि आसपासच्या परिसरातील लोकांना भूकंपाचे धक्के जाणवले, ज्यामुळे घबराटीचे वातावरण निर्माण झाले. भूकंपाचे केंद्र भरूचपासून सुमारे ४५ किलोमीटर अंतरावर असलेल्या जंबुसरजवळ होते. भूकंपाच्या दृष्टीने कच्छचा भाग संवेनदशील Kachchh Earthquake। गुजरात राज्य आपत्ती व्यवस्थापन प्राधिकरणाने (GSDMA) दिलेल्या माहितीनुसार, गेल्या २०० वर्षांत गुजरातमध्ये नऊ मोठे भूकंप झाले आहेत, त्यापैकी बरेच भूकंप कच्छमध्ये झाले आहेत. कच्छ प्रदेश हा भूकंपप्रवण मानला जातो कारण तो सक्रिय भूकंपीय क्षेत्रात आहे. २००१ चा कच्छ भूकंप आठवणाऱ्यांना अजूनही भीती वाटते. भचौजवळील ६.९ रिश्टर स्केलचा भूकंप विनाशकारी होता. सुमारे १३,८०० लोकांचा मृत्यू झाला, तर १,६७,००० हून अधिक लोक जखमी झाले. २००१ चा भूकंप २०० वर्षातील तिसरा सर्वात मोठा आणि दुसऱ्या क्रमांकाचा सर्वात विनाशकारी मानला गेला. भूज भूकंपाच्या कहाण्या भयानक आहेत.