Haryana Elections : हरियाणा निवडणुकीपूर्वी आप उमेदवाराचा भाजपमध्ये प्रवेश

Haryana Elections – हरियाणा विधानसभा निवडणुकीतील आपचे उमेदवार प्रवेश मेहता यांनी अचानकपणे भाजपमध्ये प्रवेश केला. ती घडामोड हरियाणात राजकीय बस्तान बसवण्यासाठी प्रयत्नशील असणाऱ्या आपसाठी मोठा हादरा ठरली.
हरियाणाच्या राजकीय रणसंग्रामात आप स्वबळावर ताकद आजमावत आहे. त्या पक्षाने फरिदाबाद मतदारसंघात मेहता यांना उमेदवारी दिली. मात्र, आपला राजकीयदृष्ट्या चकित करत त्यांनी शनिवारी भाजपमध्ये प्रवेश केला.
भाजपच्या प्रचारसभेत त्यांनी त्या पक्षात प्रवेश करत असल्याची घोषणा केली. त्या सभेला केंद्रीय मंत्री कृष्णनपाल गुर्जर आणि भाजपचे उमेदवार विपुल गोयल उपस्थित होते.
हरियाणात ५ ऑक्टोबरला मतदान होणार आहे. मात्र, आठवडाभर आधी मेहता यांनी भाजपमध्ये केलेला प्रवेश आपला धक्का देणारा ठरला आहे. मेहता यांनी अचानक उचललेल्या पाऊलामुळे फरिदाबादमध्ये आता आपचा उमेदवार नसेल.
हरियाणात सत्तारूढ भाजप आणि प्रमुख विरोधी पक्ष कॉंग्रेसमध्ये मुख्य लढत होणार असल्याचे मानले जाते. मात्र, आप आणि इतर लहान पक्षांमुळे त्या राज्यातील अनेक मतदारसंघांमध्ये बहुरंगी लढती होणार आहेत. आपचा प्रभाव त्या राज्यात पडणार का याविषयी मोठी उत्सुकता आहे.





