Pune : हर्षवर्धन सपकाळांचा भाजपवर हल्लाबोल; भाजपसाठी त्यांचं बायबल म्हणजे ‘बंच ऑफ थॉट’!

Harshvardhan Sapkal | आज महात्मा ज्योतिबा फुले यांची जयंती असल्याने त्यांना अभिवादन करण्यासाठी नेते मंडळी पुण्यातील फुले वाड्यात दाखल झाले होते. काँग्रेस पक्षाचे प्रदेशाध्यक्ष हर्षवर्धन सपकाळ यांनी देखील महात्मा फुले आणि सावित्रीबाई फुले यांच्या स्मृतीला अभिवादन केले. यानंतर त्यांनी माध्यमांशी संवाद साधला. त्यांनी सत्ताधारी पक्षावर टीका केली.
महात्मा ज्योतिबा फुलेंचा जो वैचारिक संघर्ष आहे जो वैचारिक मशाल आहे. ती कुठल्याही परिस्थितीत आम्ही सोडणार नसल्याचे प्रतिपादन त्यांनी केले. राज्यात महिलांवर होणारे अत्याचार त्यांचे प्रश्न आणि बंद पडत असलेल्या सरकारी शाळा यावर देखील भाष्य केले. तर भाजपसाठी त्यांचं बायबल म्हणजे बंच ऑफ थॉट असल्याची जहरी टीका त्यांनी यावेळी बोलताना केली.
महात्मा ज्योतिबा फुले यांचे भारताच्या समाज व्यवस्थेमध्ये संविधानाच्या निर्माणमध्ये अनन्य साधारण महत्व आहे. जी परिवर्तनाची समतेची, बंधुत्वाची, सामाजिक न्यायाची भूमिका आपल्या महान संविधानामध्ये संमेलित झाली. याची ज्योत याची तेवत ठेवण्याचं किंबहुना हस्तांतरित करण्याचं काम महात्मा ज्योतिबा फुले तथा फुले दाम्पत्यांनी केले आहे.
महात्मा ज्योतिबा फुलेंचा जो वारसा आणि वसा हा बहुजन समाजालाच नव्हे तर आपल्या सर्वांना पुढे घेऊन जाण्याची आवश्यकता आहे. मात्र महात्मा ज्योतिबा फुले, सावित्रीबाई हे दोघंही ज्या प्रवृत्तीच्या विरोधात लढले. त्या प्रवृत्तींनी आज पुन्हा एकदा डोकं वर काढलेलं आहे.
भाजपसाठी त्यांचं बायबल म्हणजे बंच ऑफ थॉट
सरकारी शाळा बंद होत आहेत. महिलांवर अत्याचार होण्याच्या घटना वाढलेल्या आहेत. स्वयंसेवक संघाच्या बंच ऑफ थॉट या पुस्तकांमध्ये या विचारसरणीचा उल्लेख आहे. भाजपसाठी त्यांचं बायबल म्हणजे बंच ऑफ थॉट असल्याचे सपकाळ म्हणाले. महिलांनी शिकू नये हे त्यामध्ये मान्य केलेला असे देखील ते म्हणाले.





