Harshvardhan Patil: हर्षवर्धन पाटलांची मोठी घोषणा! नीरा-भीमाच्या विकासाचे ‘हे’ मॉडेल ठरणार राज्यासाठी दिशादर्शक
Harshvardhan Patil: नीरा-भीमा सहकारी साखर कारखान्याची २८ वी वार्षिक सर्वसाधारण सभा संपन्न; सीबीजी, इथेनॉल, सहवीज आणि कृत्रिम बुद्धिमत्तेवर (AI) विशेष भर.

Harshvardhan Patil – बदलत्या परिस्थितीत साखर उद्योगासमोरील आव्हानांवर मात करण्यासाठी ऊस उत्पादनवाढ, उपपदार्थ निर्मिती, पर्यावरणपूरक ऊर्जा आणि आधुनिक तंत्रज्ञानाचा प्रभावी वापर यावर भर देत नीरा-भीमा सहकारी साखर कारखान्याचा विकासाचा नवा आराखडा तयार करण्यात आला आहे. कारखान्यात 12 टन प्रतिदिन क्षमतेचा संपीडित जैववायू (सीबीजी) प्रकल्प उभारण्याचे नियोजन असून,
इथेनॉल, सहवीज निर्मिती, जैवखत आणि कृत्रिम बुद्धिमत्ता तंत्रज्ञानाच्या माध्यमातून नीरा-भीमाच्या विकासाचे मॉडेल राज्यभर पोहोचविण्याचा प्रयत्न केला जाईल, अशी माहिती राष्ट्रीय सहकारी साखर कारखाना महासंघाचे अध्यक्ष तथा कारखान्याचे संस्थापक हर्षवर्धन पाटील यांनी दिली. शहाजीनगर (ता. इंदापूर) येथील नीरा-भीमा सहकारी साखर कारखान्याची सन 2025-26 ची 28 वी वार्षिक सर्वसाधारण सभा शुक्रवारी भाग्यरत्न सांस्कृतिक भवनात खेळीमेळीच्या वातावरणात पार पडली.
सभेच्या अध्यक्षस्थानी कारखान्याच्या अध्यक्षा सौ. भाग्यश्री पाटील होत्या. सभेत विविध विषयांना एकमताने मंजुरी देण्यात आली. हर्षवर्धन पाटील म्हणाले, देशातील वाढती ऊर्जेची गरज लक्षात घेऊन सीबीजी प्रकल्प उभारण्याचे नियोजन करण्यात आले आहे. या प्रकल्पासाठी प्रेसमड, स्पेंटवॉश, बहुवर्षीय नेपियर व गिनी गवत तसेच शेतीतील अवशेष मोठ्या प्रमाणात उपलब्ध होणार आहेत.
त्यामुळे प्रकल्प वर्षभर सुरू ठेवणे शक्य होईल. सीबीजीला देशभरात मागणी असून शासनाकडून या प्रकल्पासाठी अनुदानही उपलब्ध होणार आहे. कृत्रिम बुद्धिमत्ता तंत्रज्ञानाच्या वापरामुळे ऊस उत्पादनात सुमारे 25 ते 30 टक्के वाढ अपेक्षित आहे. त्यासाठी कारखान्याच्या कार्यक्षेत्रातील पाच गटांमध्ये स्वयंचलित हवामान केंद्रे उभारण्यात येणार आहेत.
हवामानातील बदलांचा अचूक अंदाज मिळाल्याने शेतकर्यांना पाणी, खत व कीडनियंत्रणाचे नियोजन अधिक प्रभावीपणे करता येणार आहे. नीरा नदीवरील कळंब ते नीरा नरसिंहपूरपर्यंतचे 13 बंधारे, तसेच भीमा नदीवरील भाटनिमगाव, टणू व शेवरे येथील तीन बंधारे, असे एकूण 16 बंधारे अडविण्याची जबाबदारी नीरा-भीमा कारखाना घेणार आहे.
प्रारंभी कर्मयोगी शंकररावजी पाटील व लोकनेते शहाजीराव पाटील यांच्या प्रतिमांचे पूजन करण्यात आले. कार्यकारी संचालक एन. ए. सपकाळ यांनी अहवालाचे वाचन केले. कार्यालयीन अधीक्षक सुभाष घोगरे यांनी श्रद्धांजली ठराव मांडला. पंडितराव पाटील यांनी मनोगत व्यक्त केले, तर उपाध्यक्ष दादासाहेब घोगरे यांनी आभार मानले. संचालक, पदाधिकारी, सभासद, अधिकारी व कर्मचारी उपस्थित होते.
इथेनॉल ही काळाची गरज
देशातील अडचणीत असलेल्या साखर उद्योगाला इथेनॉलशिवाय पर्याय नाही. इथेनॉल ही काळाची गरज आहे. ई-20 इथेनॉलच्या संदर्भात सध्या अपप्रचार केला जात असला तरी पेट्रोलमध्ये इथेनॉल मिश्रणामुळे देशाच्या परकीय चलनाची मोठ्या प्रमाणात बचत झाली आहे. देशाच्या आर्थिक प्रगतीसाठी इथेनॉल आवश्यक असल्याचे पाटील यांनी स्पष्ट केले.






