Ethanol news : “इथेनॉल मिश्रण नसते तर पेट्रोल १२५ रुपयांवर पोहोचले असते”; मोदी सरकारने संसदेत स्पष्टच सांगितलं…
Ethanol news : इथेनॉल ब्लेंडिंगमुळे केवळ पेट्रोलचे दर नियंत्रणात राहत नाहीत, तर शेतकऱ्यांनाही याचा थेट फायदा होतो. कृषी क्षेत्राला पाठबळ देण्यासाठी आणि इंधनाचा पुरेसा पुरवठा कायम ठेवण्यासाठी तेल कंपन्या इथेनॉलची खरेदी करतात.

Ethanol news – पेट्रोलमध्ये इथेनॉल मिसळले नसते, तर त्याचे दर किती असते? या बहुचर्चित प्रश्नाचे उत्तर नुकतेच सरकारने संसदेत स्पष्ट केले आहे. इथेनॉल ब्लेंडिंग (मिश्रण) धोरणामुळे केवळ देशाचे कच्च्या तेलाच्या आयातीवरील अवलंबित्व कमी झाले नाही, तर जागतिक संकटाच्या काळातही सर्वसामान्यांना महागड्या पेट्रोलपासून मोठा दिलासा मिळाला आहे.
लोकसभेत विचारलेल्या एका लेखी प्रश्नाला उत्तर देताना पेट्रोलियम आणि नैसर्गिक वायू राज्यमंत्री सुरेश गोपी यांनी हे गणित स्पष्ट केले. मध्य पूर्वेतील संकटादरम्यान जेव्हा कच्च्या तेलाच्या किमती प्रति बॅरल १३५ डॉलरपर्यंत पोहोचल्या होत्या, तेव्हा भारतात पेट्रोलचा दर प्रति लिटर सुमारे १२५ रुपयांपर्यंत जाऊ शकला असता.
मात्र, सरकारच्या इथेनॉल ब्लेंडिंग धोरण, कच्च्या तेलाची उपलब्धता आणि तेल कंपन्यांच्या खरेदी रणनीतीमुळे ग्राहकांना प्रति लिटर सुमारे ९४.७७ रुपये दराने पेट्रोल उपलब्ध करून देणे शक्य झाले, असे त्यांनी सांगितले. (Ethanol news)
सरकारने दिलेल्या माहितीनुसार, देशात गेल्या अनेक वर्षांपासून इथेनॉल मिश्रित पेट्रोलचा वापर केला जात आहे. सध्या देशात २० कोटींहून अधिक दुचाकी आणि ३ कोटींहून अधिक पेट्रोल कार इथेनॉल मिश्रित इंधनावर चालत आहेत.
एवढ्या मोठ्या प्रमाणावर वापर होऊनही इंजिन खराब होणे, गंज चढणे किंवा सुटे भाग लवकर घासले जाणे अशा स्वरूपाच्या मोठ्या तक्रारी समोर आलेल्या नाहीत.
शेतकरी आणि अर्थव्यवस्थेला मोठा फायदा (Ethanol news )
इथेनॉल ब्लेंडिंगमुळे केवळ पेट्रोलचे दर नियंत्रणात राहत नाहीत, तर शेतकऱ्यांनाही याचा थेट फायदा होतो. कृषी क्षेत्राला पाठबळ देण्यासाठी आणि इंधनाचा पुरेसा पुरवठा कायम ठेवण्यासाठी तेल कंपन्या इथेनॉलची खरेदी करतात.
यामुळे देशाचा परकीय चलनातील खर्च वाचतो आणि कच्च्या तेलाच्या आयातीवरील अवलंबित्वही घटते. येत्या काळात इथेनॉल मिश्रण कार्यक्रम ऊर्जा सुरक्षा आणि शेतकऱ्यांचे उत्पन्न वाढवण्यात अत्यंत महत्त्वाची भूमिका बजावत राहील, असा विश्वास सरकारने व्यक्त केला आहे.





