Harbhajan Singh Video : ‘भारत-पाक मॅच नको’ म्हणणाऱ्या भज्जीने पाकिस्तानी खेळाडूशी केले हस्तांदोलन, VIDEO व्हायरल

Harbhajan Singh Video Viral : बीसीसीआयच्या भूमिकेमुळे आणि आशिया कपमधील टीम इंडियाच्या कृतीमुळे सध्या भारत-पाकिस्तान क्रिकेट संबंधांवर तणाव आहे. नुकत्याच झालेल्या आशिया कपमध्ये भारतीय संघाने पाकिस्तानच्या खेळाडूंशी सामना संपल्यावर हात न मिळवण्याचा निर्णय घेतला होता. या निर्णयाचे माजी क्रिकेटपटू हरभजन सिंगसह अनेकांनी समर्थन केले होते. मात्र, आता हरभजन सिंगचा एक व्हिडीओ सोशल मीडियावर व्हायरल होत आहे, ज्यामुळे त्याला टीकेला सामोरे जावे लागत आहे.
हरभजन सिंग सध्या अबू धाबी टी-10 लीगमध्ये ‘एस्पिन स्टॅलियंस’ संघाचे नेतृत्व करत आहेत. 19 नोव्हेंबर रोजी शेख झायेद स्टेडियमवर त्याच्या संघाचा सामना ‘नॉर्दन वॉरियर्स‘शी झाला, ज्यात त्यांच्या संघाचा चार धावांनी निसटता पराभव झाला. हा सामना संपल्यानंतर हरभजन सिंगल पाकिस्तानी वेगवान गोलंदाज शहनवाज दहानी याच्याशी हस्तांदोलन करताना पाहिले गेले. या घटनेचा व्हिडिओ सोशल मीडियावर मोठ्या प्रमाणात व्हायरल झाला आहे.
हरभजन सिंगवर ‘यु-टर्न’चा आरोप –
Harbhajan Singh handshake with Shahnawaz Dahani. Ab kahan gai patriotism indians ki. #AbuDhabiT10 @iihtishamm pic.twitter.com/4ZFfgP2ld3
— Ather (@Atherr_official) November 19, 2025
या कृतीमुळे अनेक चाहते हरभजन सिंगवर नाराजी व्यक्त करत आहेत आणि जोरदार टीका करत आहेत. आशिया कप सुरू होण्यापूर्वी हरभजन सिंगने स्पष्टपणे म्हटले होते की, जोपर्यंत भारत-पाकिस्तानचे संबंध सुधारत नाहीत, तोपर्यंत दोन्ही देशांदरम्यान क्रिकेट सामने खेळले जाऊ नयेत. त्याच्या याच वक्तव्याचा संदर्भ देत, चाहत्यांकडून त्याच्यावर ‘यु-टर्न’ घेतल्याचा आणि दुटप्पी भूमिका घेतल्याचा आरोप केला जात आहे.
‘इंडिया-ए’ संघाचीही कठोर भूमिका –
यापूर्वी, दोहामध्ये सुरू असलेल्या ‘आशिया कप रायझिंग स्टार्स’मध्ये ‘इंडिया-ए’ संघानेही पाकिस्तान-ए संघाविरुद्ध खेळताना कठोर भूमिका घेतली होती. भारताचा ‘ए’ संघ हरला असला तरी, कर्णधार जितेश शर्माने टॉसच्या वेळी आणि सामना संपल्यावरही पाकिस्तानी खेळाडूंशी हस्तांदोलन केले नव्हते. आता भारत आणि पाकिस्तानचे ‘ए’ संघ ‘रायझिंग स्टार्स एशिया कप’च्या फायनलमध्ये पुन्हा भिडण्याची शक्यता आहे. अशा परिस्थितीत हरभजन सिंगच्या या कृतीमुळे नवा वाद निर्माण झाला आहे.





