Nitin Gadkari E20 Challenge: “E20 मुळे एका जरी वाहनाचे नुकसान झाले, तर त्याचे नाव सांगा,” ; इथेनॉल-मिश्रित पेट्रोलला गडकरींचे खुले आव्हान
Nitin Gadkari E20 Challenge: E20 पेट्रोलवरील वाद आता मोठ्या प्रमाणात सुरू आहे. काहींच्या मते त्यामुळे मायलेज कमी होते, तर काही जण इंजिनच्या आयुर्मानावर प्रश्नचिन्ह उपस्थित करत आहेत.

Nitin Gadkari E20 Challenge: E20 पेट्रोलवरील वाद आता मोठ्या प्रमाणात सुरू आहे. काहींच्या मते त्यामुळे मायलेज कमी होते, तर काही जण इंजिनच्या आयुर्मानावर प्रश्नचिन्ह उपस्थित करत आहेत. ही चर्चा सोशल मीडियापासून ते रस्त्यांपर्यंत जोर धरत आहे. आता केंद्रीय मंत्री नितीन गडकरी यांनी या प्रकरणी एक निवेदन जारी करून या वादाला आणखी धार आणली आहे.
गडकरी यांनी या वादावर, “जर E20 पेट्रोलमुळे एका जरी गाडीचे नुकसान झाले असेल, तर कृपया तिचे नाव सांगा.” त्यांनी असे आव्हान दिले आहे. E20 च्या विरोधात एक खोटी आणि पैसे देऊन चालवलेली मोहीम चालवली जात आहे.
दरम्यान , अनेक लोकांचा असा दावा आहे की २० टक्के इथेनॉल मिसळलेले E20 पेट्रोल वाहनांचे मायलेज कमी करत आहे आणि वाहनाच्या भागांवर परिणाम करत आहे. दरम्यान, केंद्रीय रस्ते वाहतूक आणि महामार्ग मंत्री नितीन गडकरी यांनी टीकाकारांना थेट आव्हान दिले. ते म्हणाले, “जर E20 पेट्रोलमुळे कोणत्याही कार, बाईक किंवा स्कूटरमध्ये काही समस्या निर्माण झाली असेल, तर कृपया फक्त एक उदाहरण द्या.”
‘E20 मुळे कोणत्याही वाहनात कोणतीही समस्या निर्माण झालेली नाही’
नितीन गडकरी यांनी स्पष्टपणे सांगितले की, आतापर्यंत देशात एकही अशी घटना समोर आलेली नाही, जिथे ई२० पेट्रोलमुळे गाडी बंद पडली असेल. अशा प्रकारचे प्रकरण असलेल्या कोणालाही आपले नाव उघड करण्याचे आवाहन त्यांनी केले.
गडकरी यांनी असाही आरोप केला की, E20पेट्रोलबद्दल खोटी माहिती पसरवली जात आहे आणि त्याविरोधात पैसे देऊन प्रचारमोहिमा चालवल्या जात आहेत.
गडकरी म्हणाले की, भारत दरवर्षी अंदाजे २२ लाख कोटी रुपयांचे जीवाश्म इंधन आयात करतो. यामुळे देशाच्या अर्थव्यवस्थेवर मोठा भार पडतो आणि प्रदूषणही वाढते. ते म्हणाले की, देशाला हरित इंधन आणि इतर पर्यायी इंधनांचा अवलंब करण्याची गरज आहे. इथेनॉल मिश्रित पेट्रोलमुळे कच्च्या तेलाच्या आयातीवरील अवलंबित्व कमी होईल आणि कार्बन उत्सर्जनही कमी होईल.
गडकरी म्हणाले की, देशातील वाढलेल्या इथेनॉल उत्पादनाचा शेतकऱ्यांनाही मोठा फायदा झाला आहे. त्यांनी स्पष्ट केले की, जेव्हा सरकारने मक्यापासून इथेनॉल उत्पादन करण्याचा निर्णय घेतला, तेव्हा मक्याचा बाजारभाव सुमारे १,२०० रुपये प्रति क्विंटल होता, तर किमान आधारभूत किंमत (एमएसपी) १,८०० रुपये प्रति क्विंटल होती. त्यानंतर, मक्याचा भाव सुमारे २,८०० रुपये प्रति क्विंटलपर्यंत वाढला. त्यांनी दावा केला की यामुळे उत्तर प्रदेश आणि बिहारमधील शेतकऱ्यांचे उत्पन्न अंदाजे ४५,००० कोटी रुपयांनी वाढले.
कौटुंबिक कंपन्यांबद्दल गडकरी काय म्हणाले?
इथेनॉल उत्पादनात कौटुंबिक कंपन्यांच्या सहभागाच्या आरोपांबाबत गडकरी म्हणाले की, त्यांच्या कुटुंबाच्या मालकीचे साखर कारखाने असले तरी, त्यांच्या कंपन्या इथेनॉल व्यवसायावर अवलंबून नाहीत. त्यांनी सांगितले की, ई२० ला प्रोत्साहन देण्याचा निर्णय वैयक्तिक फायद्यासाठी नव्हे, तर देश आणि शेतकऱ्यांच्या हितासाठी घेण्यात आला होता.
सरकार आता ई२० च्या पलीकडे अधिक इथेनॉल मिश्रित इंधनांचा वापर वाढवण्याची तयारी करत आहे. रस्ते वाहतूक आणि महामार्ग मंत्रालयाने केंद्रीय मोटार वाहन नियम, १९८९ मध्ये सुधारणा प्रस्तावित केल्या आहेत. यामुळे ई८५, ई१००, बी१०० बायोडिझेल आणि हायड्रोजन-सीएनजी यांसारख्या पर्यायी इंधनांच्या वापराचा मार्ग मोकळा होईल. यामुळे भविष्यात फ्लेक्स-फ्यूएल आणि बायोफ्यूएलवर चालणाऱ्या वाहनांचा अवलंब करण्यास प्रोत्साहन मिळेल.






