Influenza H3N2 : देशात इन्फ्लूएंझा ‘एच3एन2’चा धोका वाढला; सर्वाधिक परिणाम महाराष्ट्रात…

नवी दिल्ली/मुंबई :- दिल्ली, गुजरात, महाराष्ट्रासह देशातील अनेक राज्यांमध्ये इन्फ्लूएंझा “एच3एन2′ विषाणूचा धोका वाढला आहे. या विषाणूमुळे देशात आतापर्यंत 9 जणांचा मृत्यू झाला असून यात राज्यातील 2 रुग्णांचा समावेश आहे. या विषाणूचा सर्वाधिक परिणाम महाराष्ट्रात झाला आहे. आतापर्यंत विषाणूची 352 प्रकरणे नोंदवली गेली आहेत.
बीएमसीच्या म्हणण्यानुसार, मुंबईत 32 रुग्ण दाखल आहेत, त्यापैकी 4 एच3एन2 आणि 28 रुग्ण एच1एन1 चे आहेत. या सर्व रुग्णांची प्रकृती सध्या स्थिर आहे. राज्यात इन्फ्लूएंझा एच3एन2 चा धोका लक्षात घेता मुख्यमंत्री एकनाथ शिंदे आज आरोग्य अधिकाऱ्यांची बैठक घेत सतर्कतेचा इशारा दिला आहे.
दरम्यान, महाराष्ट्र राज्यात इन्फ्लुएंझा आजाराबाबत सतर्क राहण्याच्या सूचना सर्व जिल्ह्यातील आरोग्य यंत्रणांना देण्यात आल्या असून राज्यस्तरावरून नियमितपणे सनियंत्रण करण्यात येत आहे. नागरिकांनी लक्षणे दिसल्यास दवाखान्यात जाऊन उपचार घ्यावेत, दिरंगाई करु नये, असे आवाहन आरोग्य मंत्री प्रा. डॉ. तानाजी सावंत यांनी केले आहे.
Influenza : ‘इन्फ्लुएंझा’ची लक्षणे दिसल्यास लगेचच उपचार करून घ्यावेत – आरोग्यमंत्री सावंत
मंत्री सावंत म्हणाले, एच३एन२ फ्ल्यू सदृश्य साथरोगाचे रुग्ण रोज वाढत आहेत. अहमदनगर आणि नागपूरमध्ये एका व्यक्तीचा एच३एन२ ने मृत्यू झाला आहे. इन्फ्लुएंझा ए आजार विषाणूमुळे होणारा आजार आहे. इन्फ्लुएंझा ए चे वेगवेगळे उपप्रकार आहेत. उदा. एच१एन१ एच३एन२ इ. या आजाराची सर्वसाधारण लक्षणे ताप, खोकला घशात खवखव, धाप लागणे, न्यूमोनिया अशी लक्षणे आढळून येतात. इन्फ्लुएंझा ए बाबत रुग्ण सर्वेक्षण मुख्यतः लक्षणाधारीत आहे. याबाबत सर्व आरोग्य केंद्रात रुग्णाची तपासणी करण्यात येते व मार्गदर्शक सूचना नुसार उपचार करण्यात येतात.





