Nepal snowfall : नेपाळमधील बर्फवृष्टीमुळे सहा भारतीय अडकले
अडकून पडलेले भारतीय पर्यटक राजधानी काठमांडूच्या वायव्येला ३०० किलोमीटर अंतरावरील शेय फोकसुंदो ग्रामीण महापालिकेच्या वॉर्ड क्रमांक ८ मधील धो भागात गेले होते.

Nepal snowfall – नेपाळमधील तुफान बर्फवृष्टी होत असल्यामुळे शेय-फोकसुंदो राष्ट्रीय उद्यानामध्ये २ महिलांसह ६ भारतीय शनिवारी दुपारपासून अडकले आहेत. या सर्वांना सोडवण्यासाठी सुरक्षा कर्मचाऱ्यांनी प्रयत्न सुरू केले असल्याचे अधिकाऱ्यांनी रविवारी सांगितले.
अडकून पडलेले भारतीय पर्यटक राजधानी काठमांडूच्या वायव्येला ३०० किलोमीटर अंतरावरील शेय फोकसुंदो ग्रामीण महापालिकेच्या वॉर्ड क्रमांक ८ मधील धो भागात गेले होते.
या भागात र्फवृष्टी सुरू आहे, असे डोलपा मुख्य जिल्हा अधिकारी जुनू धकाल यांनी सांगितले. शेय पोकसुंदो तलाव समुद्रसपाटीपासून ३,६०० मीटर उंचीवर आणि अंदाजे १४५ मीटर खोल आहे. नेपाळमधील हा सर्वात खोल तलाव असल्याचे मानले जाते.
अडकून पडलेल्या पर्यटकांचे ठिकाण निश्चित झाल्यावर त्यांना सोडवण्यासाठी लष्कराचे हेलिकॉप्टर मागवण्यात आले आहे. मात्र खराब हवामानामुळे लष्कराचे हेलिकॉप्टर या भागात उतरू शकले नाही. हेलिकॉप्टरला न उतरता परत फिरावे लागले.
त्यामुळे बचाव मोहिम सोमवारपर्यंत स्थगित करण्यात आली आहे. आता स्थानिक प्रशासन सिमरिक एअर या खासगी हेलिकॉप्टरची मदत घेण्यासाठी प्रयत्नशील आहे, असे असे धकाल यांनी सांगितले.





