पुणे जिल्हा | गुंजवणीचा पाणी प्रश्न मार्गी लावणार

सासवड, (प्रतिनिधी) – पुरंदर अनेक वर्षे मी ऐकत असलेला गुंजवणी प्रकल्प व लोकसभ निवडणुकीच्या निमित्ताने माझ्यासमोर पुरंदर तालुक्यातील विविध प्रश्न आले होते .
यामध्ये गुंजवणीच्या पाण्याचा प्रश्न तालुक्याच्या दृष्टीने ऐरणीवर होता त्या प्रश्नासह सर्व इतर प्रश्न सोडवण्यावर मी स्वतः भर देणार असून आगामी विधानसभा निवडणुकीसाठी पुरंदरची जागा ही राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाला मिळण्यासाठी उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्याकडे पाठपुरावा करणार असल्याचे मत राज्यसभेच्या खासदार सुनेत्रा पवार यांनी व्यक्त केले.
सासवड (ता. पुरंदर) येथील आचार्य अत्रे सांस्कृतिक भवनात राष्ट्रवादी काँग्रेस अजित पवार गटाच्या वतीने निर्धार मेळाव्याचे आयोजन करण्यात आले होते. त्यावेळी खासदार पवार बोलत होत्या.
यावेळी महिला आयोगाच्या अध्यक्षा रुपाली चाकणकर, मावळचे आमदार सुनील शेळके, माजी आमदार संभाजी कुंजीर, जिल्हा बँकेचे अध्यक्ष प्रा. दिगंबर दुर्गाडे, राष्ट्रवादी युवक प्रदेशाध्यक्ष सुरज चव्हाण, जिल्हा बँकेचे उपाध्यक्ष सुनील चव्हाण,
युवती कार्याध्यक्ष निर्मला नवले, महिला पुणे जिल्हाध्यक्ष मोनिका हरगुडे, युवक पुणे जिल्हा अध्यक्ष सचिन घोटकुले, पश्चिम महाराष्ट्राचे अध्यक्ष राष्ट्रवादी राकेश कामठे, माजी-माजी महापौर राजलक्ष्मी भोसले, जिल्हा बँकेच्या संचालिका निर्मला जागडे, पूजा बुट्टे पाटील, भालचंद्र जगताप, प्रचिती देशमुख आदी उपस्थित होते.
खासदार सुनेत्रा पवार म्हणाल्या की, अर्थमंत्री अजितदादा पवार यांनी गरीब माणुस केंद्र बिंदु मानुन समाजाभिमुख निर्णय घेऊन महिलांना जास्तीत जास्त प्राधान्य देण्याचा प्रयत्न केला आहे. लाडकी बहिण या योजनेला मोठा प्रतिसाद मिळाला आहे.
शेतकर्यांसाठी वीज माफ, महिलांसाठी पिंक रिक्षा, ज्येष्ठांसाठीच्या योजना, विद्यार्थी यांच्यासाठी शैक्षणिक मदत अशा अनेक शासनाच्या योजनांचा लोक फायदा घेत असून या शासनाचे कौतुक करताना पहावयास मिळत आहेत.
महायुतीचे सरकार पुन्हा येणार आहे, असे त्यांनी सांगितले. सुरज चव्हाण म्हणाले की, प्रा. दिगंबर दुर्गाडे सारखा माणूस विधानसभेमध्ये जाणे गरजेचे आहे. दुर्गाडे यांनी अर्थशास्त्रामध्ये पीएचडी घेतली असून पुणे जिल्हा मध्यवर्ती बँकेचा कारभार अत्यंत पारदर्शकपणे करीत असल्याचे त्यांनी नमूद केले.
पुरंदर तालुक्यातील गुंजवणी, विमानतळ, दिवे येथील आयटी पार्क, याच्यासह आमच्या अनेक मागणी असून या मागण्या आपण अजित पवारांच्या माध्यमातून पूर्ण करून द्याव्यात. – प्रा. डॉ. दिगंबर दुर्गाडे, अध्यक्ष, जिल्हा बँक
मी देखील विधानसभेला इच्छुक आहे. परंतु पहिले प्राधान्य जिल्हा बँकेचे अध्यक्ष प्रा. डॉ. दिगंबर दुर्गाडे यांना दिले पाहिजे. त्यानंतर माझा विचार व्हायला हवा. – दत्ता झुरंगे, माजी सदस्य, जिल्हा परिषद
जशास तसे उत्तर देणार – चाकणकर
उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी दहावेळा अर्थसंकल्प मांडला असून यामध्ये लाडकी बहीण योजना, शेतकर्यांसाठी विद्युत बिल माफ करणे, शालेय विद्यार्थ्यांसाठी शिष्यवृत्ती यासारख्या अनेक योजना राबवले आहेत.
त्या योजना तळागाळापर्यंत पोहोचवल्या पाहिजेत त्याचबरोबर विरोधक अजित पवार यांच्यावर टीका करत असतील तर जशास तसे उत्तर दिले जाईल, असे महिला आयोगाच्या अध्यक्षा रुपाली चाकणकर यांनी सांगितले.





