Vasant Davkhare Case : उद्धव ठाकरे, एकनाथ शिंदेंना न्यायालयाचा मोठा दिलासा; 17 वर्षांनंतर मानहानी खटल्यात निर्दोष मुक्तता
Vasant Davkhare Case : वसंत डावखरे यांच्या १७ वर्षे जुन्या मानहानी खटल्यात उद्धव ठाकरे, एकनाथ शिंदे, आनंद परांजपे आणि राजेंद्र देवळेकर यांची निर्दोष मुक्तता.

Vasant Davkhare Case : राष्ट्रवादी काँग्रेसचे ज्येष्ठ नेते वसंत डावखरे यांनी १७ वर्षांपूर्वी दाखल केलेल्या मानहानीच्या खटल्यातून शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे, उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे, माजी खासदार आनंद परांजपे आणि दिवंगत माजी नगरसेवक राजेंद्र देवळेकर यांची निर्दोष मुक्तता करण्यात आली. कल्याण जिल्हा व सत्र न्यायालयाचे न्यायाधीश संतोष आगे यांनी बुधवारी हा निकाल दिला. सबळ पुराव्याअभावी चौघांची मुक्तता करण्यात आली.
२००९च्या लोकसभा निवडणुकीदरम्यान शिवसेनेच्या नेत्यांनी वसंत डावखरे यांच्याशी संबंधित काही दृश्य-ध्वनी व ध्वनीमुद्रिका प्रचारसभेत दाखवल्याचा आरोप होता. त्या निवडणुकीत शिवसेनेकडून आनंद परांजपे, तर राष्ट्रवादी काँग्रेसकडून वसंत डावखरे उमेदवार होते. परांजपे विजयी झाले. त्यानंतर डावखरे यांनी बदनामी केल्याचा आरोप करत ठाकरे, शिंदे, परांजपे आणि देवळेकर यांच्याविरोधात खटला दाखल केला होता. (Vasant Davkhare Case)

Vasant Davkhare Case : उद्धव ठाकरे, एकनाथ शिंदेंना न्यायालयाचा मोठा दिलासा; 17 वर्षांनंतर मानहानी खटल्यात निर्दोष मुक्तता
या प्रकरणात पक्षाचे कार्यकर्ते, पदाधिकारी, पोलीस अधिकारी, आयोजक आणि तपास अधिकारी अशा २० साक्षीदारांच्या साक्षी नोंदवण्यात आल्या. गेल्या महिन्यात उद्धव ठाकरे आणि एकनाथ शिंदे यांनी दूरदृश्य प्रणालीद्वारे न्यायालयासमोर जबाब नोंदवले होते.
सुनावणीदरम्यान बचाव पक्षाने कथित ध्वनीमुद्रिका, न्यायवैद्यक अहवाल आणि तपास प्रक्रियेवर प्रश्न उपस्थित केले. आरोपींचा या प्रकरणाशी थेट संबंध असल्याचा ठोस पुरावा नसल्याचा दावा करण्यात आला. घटनाक्रमातील विसंगती आणि त्रुटींचा विचार करून न्यायालयाने चौघांची निर्दोष मुक्तता केली.
उद्धव ठाकरे यांचे वकील ॲड. जयेश वाणी यांनी हा खटला राजकीय हेतूने दाखल केल्याचा दावा केला. आनंद परांजपे यांनीही प्रकरणात ठोस तथ्ये नसल्याचे सांगत न्यायालयाच्या निर्णयाचे स्वागत केले.





