Raghavji Patel : गुजरातचे कृषी मंत्री राघवजी पटेल यांना ब्रेन स्ट्रोक आला, त्यानंतर त्यांना राजकोटमधील खासगी रुग्णालयात दाखल करण्यात आले. सध्या त्यांची प्रकृती स्थिर असल्याचे सांगण्यात येत आहे. 65 वर्षीय कॅबिनेट मंत्री भूपेंद्र पटेल हे सरकारमधील पशुसंवर्धन आणि मत्स्यव्यवसाय, ग्रामीण गृहनिर्माण आणि ग्रामीण विकास विभाग देखील सांभाळत आहेत.
जामनगरमध्ये शनिवारी रात्री साडे दहा च्या सुमारास त्यांच्या मेंदूच्या उजव्या बाजूला रक्तस्त्राव झाला. त्यांच्यावर जामनगर येथील रुग्णालयात प्राथमिक उपचार करण्यात आले, तेथून त्यांना राजकोटच्या सिनर्जी हॉस्पिटल मध्ये हलवण्यात आले. राजकोटच्या हॉस्पिटलच्या डॉक्टरांनी सांगितले की, ‘राघवजी पटेल यांच्या मेंदूच्या उजव्या बाजूला जामनगरमध्ये शनिवारी रात्री 10.30 वाजता रक्तस्त्राव झाला. जामनगर येथील रुग्णालयात त्यांच्यावर प्राथमिक उपचार करण्यात आले, तेथून त्यांना आमच्या रुग्णालयात आणण्यात आले. सध्या त्यांच्यावर आयसीयूमध्ये उपचार सुरू असून त्यांची प्रकृती स्थिर आहे.”
कोण आहेत राघवजी पटेल ?
राघवजी पटेल जामनगरविधानसभा मतदारसंघाचे प्रतिनिधित्व करतात. 2017 मध्ये त्यांनी काँग्रेस सोडली आणि भाजपमध्ये प्रवेश केला. ऑगस्ट 2017 मध्ये, काँग्रेसचे तत्कालीन आमदार म्हणून त्यांनी राज्यसभा निवडणुकीत काँग्रेस नेते अहमद पटेल यांच्या विरोधात मतदान केले होते. मात्र, अहमद पटेल यांनी निवडणूक जिंकली. 2017 च्या विधानसभा निवडणुकीत त्यांनी भाजपचे उमेदवार म्हणून निवडणूक लढवली, परंतु काँग्रेस नेते वल्लभ धाराविया यांच्याकडून त्यांचा पराभव झाला. यानंतर धारावीया यांच्या राजीनाम्यानंतर राघवजी पटेल विजयी झाले. २०२२ च्या विधानसभा निवडणुकीत ते पुन्हा एकदा या जागेवरून निवडून आले.