पुणे जिल्हा | सामुहिक विवाह सोहळयातील चर नामशेष होण्याच्या मार्गावर

वीसगाव खोरे (वार्ताहर) – गावाकडची लग्न गावातच न होता समोरच्यांच्या मागणीनुसार हॉलमध्ये होताना दिसत आहेत. म्हणजेच या लग्नांना हॉलमध्ये जास्त पसंती दिली जात आहे. सध्या लगीन सराई चालू झाली असून, धुमधडाक्यात लग्न करण्याकडे वर,वधू , त्यांच्या पालकांचा कल असल्याचे पहावयास मिळत आहे.यामध्ये भात, आमटी व बुंदी व इतर जेवणासाठी लागणारे अन्नपदार्थ तयार करण्यासाठी वापरण्यात येणारी चर ही स्वयंपाकासाठी केलेली व्यवस्था नामशेष होण्याच्या मार्गावर आहे.
जुन्या गावाकडच्या चालीरिती लोप पावत चालल्या आहेत. ग्रामीण भागामध्ये कोणत्याही स्वरूपाचे कार्य करताना संपूर्ण गावाची किंवा वाडीची एकत्रित बैठक कार्यक्रमाच्या निमित्ताने दोन दिवस अगोदर घेतले जात असे यामध्ये कार्यक्रमाच्या निमित्ताने येणारे नातेवाईक, पाहुणे मंडळी यांचा अंदाज बांधून त्यानुसार जेवणाची तयारी केली जात असे जेवणाचा बेत प्रामुख्याने भात, आमटी आणि बुंदी असे यासाठी लग्न किंवा कार्य मालकाकडून ठराविक एवढी रक्कम,
तांदूळ, तिखट गोळा केली जात असे ही रक्कम गाव पातळीवर तयार केलेल्या कमिटीकडे असे.ही कमिटी पुण्यामध्ये जाऊन स्वयंपाकासाठी आवश्यक असणारा जिन्नस खरेदी करून आणणे,आणलेली खरेदी व्यवस्थित रित्या ठेवणे. शुभकार्याच्या अगोदर दोन दोन दिवस बुंदी तयार करून घेणे. त्यानंतर नदी किंवा ओढ्यावरून तांदूळ धुवून आणणे ते वाळवणे ज्या दिवशी कार्य आहे त्या दिवशी हे सर्व साहित्य मंदिराच्या परिसरामध्ये ठेवणे तसेच इंधन म्हणून सरपण कार्य मालकाकडून गोळा करणे अशा प्रकारची कामे ही कमिटी करत असे.
ज्या दिवशी कार्य असेल त्या दिवशी चराचे ( जमीन खोदून बत्ते चुलीवर ठेवण्यासाठी केलेली व्यवस्था) विधिवत पूजन करून चर पेटवला जाई. गावातील गावकरी एकत्र येत सामूहिक रित्या मोठ्या हिरवीने सहभागी होत २००० नंतर हळूहळू एकत्र लग्न पद्धत बंद झाली त्यामुळे भावकी एकत्र येणे कमी होऊ लागलं त्यामुळे चरावर केली जाणारी पितळी भत्त्यातील आमटी नामशेष झाली.
गावात लग्न हा एक मोठा उत्सव असे गावात लगीन घरासमोर मोठा मंडप घातला जायचा गावातील कोणीही कामावर जाऊ नये म्हणून तंबी दिली जायची, घरटी जेवणाचे आमंत्रण असायचे, गावातील मंदिरासमोर चुलबंद आदल्या दिवशी गावातील लोकांची मोठी चरावरील जेवण मीटिंग (सभा) घेतली. वेळी गावातील एकेक लोकांना एक एक जबाबदारी दिली जात असे.
येथे रहाण्यापासून, जेवणापर्यंतच्या सर्व सुविधा दिल्या जात असे लग्न हे मुहूतांवर ठरलेल्या वेळेतच लागत असे गावातील लग्न हे मोठ्या नियोजनबद्ध होत असे. कोणाची कोणतीही तक्रार राहणार याची उत्तम पद्धतीने आणि उत्तम दक्षता गावात घेतली जात असे, लग्नातील जेवण तर पौष्टिक केले जात असे.
ग्रामीण भागात सामुदायिक विवाह सोहळे पार पडत असे.गावातील असणारे लग्न हे गावातील प्रत्येकाच्या घरातील कार्य म्हणून एकजुटीने आणि सामुहिक रित्या पार पाडण्याची गावकरी घेत असत.गावातील नागरिक जेष्ठांच्या मार्गदर्शनाखाली सकाळी चरावर पाणी भरण्यापासून संपूर्ण भोजन तयार करत.
आलेल्या पाहुण्यांचे जेवणाची व्यवस्था चोख पार पाडत.अलीकडे हाॅल मध्ये लग्न होतात आचारी मंडळी स्वयंपाक, भोजन वाढपी वाढतात.त्यामुळे समुह भावना कमी झाल्याचे पहावयास मिळते. – दत्तात्रय शिवतरे, माजी उपसरपंच, उत्रौली (ता.भोर)





