Greg Chappell : आता शुभमनची खरी परीक्षा सुरु होणार; भारतीय संघाचे माजी प्रशिक्षक ग्रेग चॅपेल यांनी व्यक्त केले मत

नवी दिल्ली : भारतीय संघाने ऐतिहासिक लॉर्ड्स मैदानावर इंग्लंडविरुद्धचा तिसरा कसोटी सामना अवघ्या २२ धावांनी गमावल्याने या पाच सामन्यांच्या अँडरसन-तेंडुलकर करंडकामध्ये १-२ ने पिछाडीवर आहे. कर्णधार शुभमन गिल भारतीय संघाचे प्रथमच कसोटीमध्ये नेतृत्व करत आहे. असे असताना देखील त्याने फलंदाजीत ६०० पेक्षा जास्त धावांचा रतीब घातला असून त्याने एक कर्णधार म्हणूनही आपल्या क्षमतेची झलक दाखवली आहे. मात्र, भारतीय संघ मालिकेत पिछाडीवर असल्याने आता शुभमनची खरी परीक्षा सुरु होणार असल्याचे मत ऑस्ट्रेलियाचे माजी कर्णधार तथा भारतीय संघाचे माजी प्रशिक्षक ग्रेग चॅपेल यांनी व्यक्त केले.
भारतीय संघ आता इंग्लंडविरुद्धच्या शेवटच्या दोन कसोटी सामन्यांची तयारी करत आहे. अशा परिस्थितीमध्ये सर्वांचे लक्ष आता भारताचा युवा कर्णधार शुभमन गिलवर आहे. तो एक प्रतिभावान तरुण खेळाडू असून त्याने इंग्लंडमध्ये चमकदार कामगिरी केली आहे, तसेच त्याने आपल्या नेतृत्वाची देखील चमक दाखवली आहे. असे असले तरी देखील भारतीय संघ पिछाडीवर असल्याने त्याच्याकडून जास्त अपेक्षा आहेत. हा त्याच्यासाठी कसोटीचा काळ आहे, कसोटी कर्णधार म्हणून त्याची दिशा आगामी दोन कसोटीतून ठरणार आहे, असे ग्रेग चॅपेल यांनी ईएसपीएन क्रिक इन्फोवर लिहिलेल्या आपल्या स्तंभात म्हटले आहे.
शुभमन गिलला चांगला कसोटी कर्णधार म्हणून पुढे यायचे असेल तर त्याला केवळ फलंदाजीच्या बरोबरीने कर्णधार म्हणून देखील आपली ओळख निर्माण करावी लागणार आहे. त्यामुळे ही त्याच्यासाठी सर्वोत्तम संधी आहे . शुभमनने स्पष्ट विचारसरणी व दृढ निश्चयाने नेतृत्व केले तर भारतीय क्रिकेटची भविष्यातील वाट देखील सुकर करु शकेल, असे त्यांनी आपल्या स्तंभात लिहिले आहे.
बेंच मार्क सेट करावा
चॅपेल यांना गिलने त्यांच्या कामगिरीद्वारे संघासाठी बेंचमार्क सेट करावा असे वाटते. शुभमनला कशा प्रकारचा संघ हवा आहे, हे दाखवावे लागणार अहे. कर्णधार हा केवळ त्याच्या शब्दांनी नव्हे तर कामगिरीने देखील संघासाठी बेंच मार्क सेट करत असतो. त्यामुळे खेळाडूंना प्रेरणा मिळते. तिसऱ्या कसोटीमध्ये भारतीय संघाने अनेक चुका केल्या, त्यामुळे त्यांना पराभवाचा सामना करावा लागला. संघाला मैदानावर शिस्तबद्ध ठेवणे, ही शुभमनची जबाबदारी आहे. पुन्हा क्षेत्ररक्षणातील चुका परवडणाऱ्या नाहीत. सर्वोत्तम संघ हा मैदानात हुशारीने लढतो, ते विरोधी संघाला सहजासहजी धावा देत नाहीत, त्यामुळे त्यांना विजयाची संधी जास्त असते, असे चॅपेल यांनी आपल्या स्तंभात लिहिले आहे.
जो जिंकून देईल असाच संघ निवड
निवडकर्त्यांनी व कर्णधार म्हणून निवडलेल्या खेळाडूंवर विश्वास ठेवणे गरजेचे आहे. त्यामुळे शुभमनला अशाच खेळाडूंची निवड करावी लागेल, ज्यांच्यावर विश्वास आहे, की हे संघाला विजय मिळवून देवू शकतील. यासाठी दृढपणाने काही निर्णय घ्यावे लागतील. याबरोबरीने शुभमन व भारतीय संघाकडे योजना हवी, ज्यामध्ये प्रत्येक खेळाडूला त्याच्या भूमीकेची स्पष्ट जाणीव असावी, अथवा ती शुभमनने करुन द्यावी, जेणेकरुन खेळाडूला मला लढतीत काय करायचे आहे, असे स्पष्ट होईल, असे ते म्हणाले.





