FIFA World Cup 2026 : नाद असावा तर असा ! आपल्या संघाला सपोर्ट करण्यासाठी चाहत्यानं विकलं आपलं राहतं घरं
फिफा वर्ल्डकप २०२६ (FIFA World Cup 2026) चा थरार अवघ्या काही दिवसांत सुरू होणार असतानाच, एका फुटबॉलवेड्या चाहत्याची ही अनोखी आणि चक्रावून टाकणारी गोष्ट समोर आली आहे.

FIFA World Cup 2026 : फुटबॉल चाहत्यांची क्रेझ आपण नेहमीच पाहतो, पण एका चाहत्याने आपल्या संघाला पाठिंबा देण्यासाठी जे काही केलंय, ते पाहून संपूर्ण क्रीडाविश्व थक्क झालं आहे.
फिफा वर्ल्डकप २०२६ (FIFA World Cup 2026) चा थरार अवघ्या काही दिवसांत सुरू होणार असतानाच, एका फुटबॉलवेड्या चाहत्याची ही अनोखी आणि चक्रावून टाकणारी गोष्ट समोर आली आहे.
फिफा वर्ल्डकपच्या तिकिटांसाठी चाहत्याने विकलं घर!
फुटबॉलचा महाकुंभ म्हणजेच ‘फिफा वर्ल्डकप २०२६’ (FIFA World Cup 2026) यंदा अमेरिका, मेक्सिको आणि कॅनडा या तीन देशांमध्ये संयुक्तपणे आयोजित केला जात आहे. येत्या १२ जून २०२६ पासून या ऐतिहासिक स्पर्धेला सुरुवात होत असून, यंदा तब्बल ४८ संघ आणि १६ शहरांमध्ये एकूण १०४ सामने खेळवले जाणार आहेत. जगभरातील चाहते आपापल्या संघाला प्रोत्साहन देण्यासाठी सज्ज झाले असताना, इंग्लंडच्या एका चाहत्याने मात्र प्रेमाची आणि वेडेपणाची सर्वच परिमाणं ओलांडली आहेत.आपल्या आवडत्या संघाचा प्रत्येक सामना स्टेडियममध्ये जाऊन पाहता यावा, यासाठी या चाहत्याने चक्क स्वतःचं हक्काचं घर विकलं आहे!
कोण आहे हा ‘फुटबॉलवेडा’ फॅशनेट फॅन?
या अतरंगी आणि कट्टर फुटबॉल प्रेमीचं नाव आहे अँडी मिल्न (Andy Milne). अँडी हे ब्रिटनमधील एक निवृत्त शिक्षक आहेत. शाळेत मुलांना ज्ञान देणारे अँडी फुटबॉलच्या बाबतीत मात्र प्रचंड भावुक आणि वेडे आहेत. यंदाचा २०२६ चा वर्ल्डकप हा त्यांच्या आयुष्यातील तब्बल १० वा विश्वचषक आहे.
तिकीट खरेदीसाठी घराचा सौदा!
अँडी मिल्न हे इंग्लंड फुटबॉल संघाचे खूप मोठे पाठीराखे आहेत. इंग्लंडचा यंदाच्या वर्ल्डकपमधील एकही सामना चुकू नये आणि प्रत्येक सामन्याचं तिकीट मिळावं, यासाठी त्यांनी नॉर्थविच येथील आपलं राहतं घर विकून टाकलं. या घराच्या विक्रीतून त्यांना तब्बल साडेचार कोटी रुपये मिळाले आणि हा सर्व पैसा त्यांनी फिफा वर्ल्डकपच्या तिकिटांवर खर्च केला आहे.
२०२२ च्या वर्ल्डकपमध्येही आले होते चर्चेत
अँडी मिल्न हे फुटबॉल जगतासाठी नवीन नाहीत. २०२२ च्या कतार वर्ल्डकप दरम्यान हातात ‘ज्यूल्स रिमेट ट्रॉफी’ची (फिफा वर्ल्डकपची जुनी ट्रॉफी) प्रतिकृती घेऊन फिरतानाचे त्यांचे फोटो सोशल मीडियावर प्रचंड व्हायरल झाले होते.
यंदाच्या फिफा वर्ल्डकपमध्ये इंग्लंड संघाचा समावेश असलेल्या गटात क्रोएशिया, घाना आणि पनामा या देशांचा समावेश आहे. आपल्या संघाला चीअर करण्यासाठी अँडी मिल्न हे स्पर्धा सुरू होण्यापूर्वीच अमेरिकेतील डॅलस शहरात दाखलही झाले आहेत.
इंग्लंडच्या साखळी सामन्यांचे वेळापत्रक
१६ जून २०२६: इंग्लंड विरुद्ध क्रोएशिया (डॅलस येथे) — हा इंग्लंडचा पहिला सामना असेल
२४ जून २०२६: इंग्लंड विरुद्ध घाना (दुसरा सामना)
२८ जून २०२६: इंग्लंड विरुद्ध पनामा (तिसरा सामना)
एखाद्या खेळाडूइतकीच किंवा कदाचित त्याहूनही अधिक मेहनत आणि त्याग एक चाहता आपल्या संघासाठी करू शकतो, याचं जिवंत उदाहरण म्हणजे अँडी मिल्न ठरले आहेत. आता त्यांच्या या अफाट त्यागाला इंग्लंडचा संघ वर्ल्डकप जिंकून न्याय देणार का? हे पाहणं उत्सुकतेचं ठरेल.






