Gram Panchayat Election : खेडमध्ये निवडणुकीचे बिगुल! ११ ० ग्रामपंचायतींच्या आरक्षण सोडतीचा कार्यक्रम जाहीर
Gram Panchayat Election : तहसीलदार प्रशांत बेडसे यांनी केली घोषणा; दोन दिवसांच्या विशेष ग्रामसभेतून होणार प्रभागनिहाय आरक्षणाचे चित्र स्पष्ट.

Gram Panchayat Election – खेड तालुक्यातील तब्बल 110 ग्रामपंचायतींच्या प्रभागनिहाय सदस्य आरक्षण सोडतीसाठी 11 व 12 जून रोजी विशेष ग्रामसभांचे आयोजन करण्यात आले असून, या प्रक्रियेमुळे ग्रामपंचायत निवडणुकांच्या हालचालींना वेग आला आहे. दोन ते तीन वर्षांपासून अनेक ग्रामपंचायतींवर प्रशासकीय राजवट असल्याने इच्छुक उमेदवार आणि स्थानिक राजकीय गटांचे लक्ष आता आरक्षण सोडतीकडे लागले आहे.
निवडणूक आयोगाच्या निर्देशानुसार संबंधित ग्रामपंचायतींमध्ये सकाळी 11 वाजता आणि दुपारी 3 वाजता अशा दोन टप्प्यांत आरक्षण सोडतीची प्रक्रिया पार पडणार असल्याची माहिती तहसीलदार प्रशांत बेडसे यांनी दिली. प्रभागनिहाय आरक्षण निश्चित झाल्यानंतर ग्रामपंचायत निवडणुकांची रणधुमाळी अधिक तीव्र होण्याची शक्यता व्यक्त होत आहे. यापूर्वी 23 जून 2025 रोजी 162 ग्रामपंचायतींच्या सरपंचपदाच्या आरक्षण सोडती काढण्यात आल्या होत्या. मात्र, ओबीसी आरक्षणासंदर्भातील न्यायालयीन प्रक्रियेमुळे फेरआरक्षणाची गरज निर्माण झाली.
त्यानंतर 7 जुलै 2025 रोजी खेड पंचायत समितीच्या शिवछत्रपती शिवाजी महाराज सभागृहात फेरआरक्षण प्रक्रिया पार पडली होती. या प्रक्रियेत अनुसूचित जमाती प्रवर्गातील 32 आणि अनुसूचित जाती प्रवर्गातील 9 अशा एकूण 41 ग्रामपंचायतींचे आरक्षण निश्चित करण्यात आले. उर्वरित ग्रामपंचायतींसाठी ओबीसी, सर्वसाधारण व सर्वसाधारण महिला प्रवर्गांचे आरक्षण जाहीर करण्यात आले होते. त्यामुळे अनेक गावांमध्ये सरपंचपदासाठी चुरशीच्या लढती होण्याची चिन्हे दिसत आहेत.





