सांगली : भाजप आमदार गोपीचंद पडळकर यांनी राष्ट्रवादी काँग्रेसचे ज्येष्ठ नेते जयंत पाटील यांच्यावर अश्लाघ्य भाषेत टीका केल्याने राज्यभरात संताप व्यक्त होत आहे. याच्या निषेधार्थ राष्ट्रवादी काँग्रेस आणि धनगर समाजाने निषेध मोर्चाचे आयोजन केले. या मोर्चात बापू बिरू वाटेगावकर यांचे पुत्र शिवाजीराव वाटेगावकर यांनी पडळकरांवर जोरदार शाब्दिक हल्ला चढवला. महाविकास आघाडीतर्फे आयोजित ‘महाराष्ट्र संस्कृती बचाव मोर्चा’ला जितेंद्र आव्हाड, विश्वजित कदम, खासदार अमोल कोल्हे, आमदार उत्तमराव जानकर, रोहित पवार, मेहबूब शेख, सक्षणा सलगर यांच्यासह हजारो नागरिक उपस्थित होते. शिवाजी वाटेगावकरांचा पडळकरांवर हल्लाबोल जयंत पाटील यांच्या कुटुंबाविषयी पडळकरांनी केलेले आक्षेपार्ह वक्तव्य चुकीचे असल्याचे सांगत शिवाजीराव वाटेगावकर यांनी पडळकरांच्या राजकीय कर्तृत्वावर प्रश्नचिन्ह उपस्थित केले. “नको तिथे तोंड खुपसून कॅमेऱ्यासमोर येण्याची पडळकरांना सवय आहे. राजाराम बापूंवर बोलण्याची त्यांची लायकी आहे का?” अशा आक्रमक शब्दांत त्यांनी पडळकरांना सुनावले. “सेवेसाठी निवडून दिलं, मापं कशाला काढतो?” वाटेगावकर यांनी पडळकरांवर टीका करताना म्हटले की, जनतेने चांगले काम आणि सेवा करण्यासाठी निवडून दिले आहे, पण पडळकरांना नको तिथे नाक खुपसण्याची सवय आहे. “जातीजातीत तेढ निर्माण करणाऱ्या अशा लोकांना जनतेने धडा शिकवला पाहिजे. शेतकऱ्यांचे प्रश्न, महागाई यावर बोलण्याऐवजी पडळकर नको त्या गोष्टींवर बोलतात. त्यांना ही अक्कल कशी नाही?” अशा रांगड्या शब्दांत त्यांनी पडळकरांना झोडपले. धनगर समाजातही पडळकरांच्या वक्तव्यामुळे प्रचंड नाराजी पसरली असून, जयंत पाटील यांच्याविरोधातील कारस्थानांना जनता प्रत्युत्तर देईल, असा इशारा वाटेगावकरांनी दिला.