Gopichand Padalkar : गोपीचंद पडळकर आणखी किती खाली घसरणार? वाचा वादग्रस्त वक्तव्यांचा जुना अध्याय

Gopichand Padalkar Vs Jayant Patil : महाराष्ट्राच्या राजकारणात एकेकाळी सौम्यता आणि सुसंस्कृतपणाची परंपरा होती. मात्र, आता ती इतिहासजमा होताना दिसत आहे. राजकीय नेत्यांमधील शाब्दिक हल्ले आणि अपशब्दांचा वापर आता नवीन नाही. याच मालिकेत भाजपचे आमदार गोपीचंद पडळकर यांनी पुन्हा एकदा आपल्या वादग्रस्त वक्तव्याने सगळ्यांचे लक्ष वेधले आहे.
यावेळी त्यांनी राष्ट्रवादी काँग्रेसचे नेते जयंत पाटील यांच्यावर टीका करताना वैयक्तिक हल्ला चढवला आणि त्यांच्या वडिलांवरही आक्षेपार्ह टिप्पणी केली आहे. गोपीचंद पडळकरांचे हे वक्तव्य राजकारणातील नीच पातळीचे नवे उदाहरण असल्याची चर्चा राजकीय वर्तुळात रंगली आहे.
जयंत पाटलांवर पडळकरांचा खालच्या पातळीचा हल्ला
जयंत पाटील हे सांगलीच्या राजकारणातील दिग्गज नेते आहेत. विविध मंत्रिपदे सांभाळताना त्यांनी आपल्या कामाचा ठसा उमटवला आहे. मात्र, गेल्या विधानसभा निवडणुकीत त्यांच्या वर्चस्वाला आव्हान मिळाले आणि याच काळात गोपीचंद पडळकर यांच्याशी त्यांचा वाद वाढला.
हा वाद आता वैयक्तिक पातळीवर गेला आहे. पडळकरांनी जयंत पाटलांना “बिनडोक” आणि “अक्कल नसलेला” असा उल्लेख करत त्यांच्या वडिलांबद्दल आक्षेपार्ह वक्तव्य केले. “जयंत पाटील हे राजारामबापू पाटील यांची औलाद वाटत नाही,” असे शब्द वापरत पडळकरांनी सर्व मर्यादा ओलांडल्या आहेत.
पडळकरांचा वादग्रस्त वक्तव्यांचा इतिहास
पडळकर यांच्या वक्तव्यांची मालिका ही नवीन नाही. यापूर्वीही त्यांनी अनेकदा खालच्या पातळीवर टीका केली आहे
२०२० : शरद पवारांना “महाराष्ट्राला लागलेला कोरोना” म्हणाले होते. यामुळे देखील मोठा वाद झाला होता.
२०२१ : पवार कुटुंबीयांवर “सासू ख्रिश्चन, नवरा ब्राह्मण, बाप मराठा” अशी टीका करत “कॉकटेल घर” असा अपमान केला.
२०२३ : “महाराष्ट्रात जाती-जातीत भांडण लावणारा लांडगा” म्हणून पवारांना लक्ष्य केले.
२०२५ : रोहित पवारांना “औरंगजेबाच्या वृत्तीचा” म्हणाले आणि जयंत पाटलांना “कपटी आणि नीच” अशी संज्ञा दिली.
नवीन वाद : जयंत पाटलांच्या वडिलांचा अपमान करत “औलाद” आणि “गडबड” असे शब्द वापरले.
या वक्तव्यांमुळे पडळकरांना भाजपच्या वरिष्ठ नेत्यांकडून वेळोवेळी समज देण्यात आली आहे. मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनीही पडळकरांचे वक्तव्य चुकीचे असल्याचे सांगितले आणि त्यांना भविष्यात जपून बोलण्याचा सल्ला दिला. मात्र, ठोस कारवाईचा अभाव असल्याने पडळकरांचा शिवराळपणा थांबलेला नाही.
सुसंस्कृत राजकारणाची अपेक्षा व्यर्थ?
दरम्यान, महाराष्ट्राच्या राजकारणात अशा प्रकारची वक्तव्ये आता नित्याची झाली आहेत. सर्वच पक्षांमध्ये अशा वाचाळ नेत्यांची संख्या वाढत आहे. पक्षनेतृत्वाकडून काही वेळा समज दिली जाते, तर काही वेळा या प्रकारांकडे दुर्लक्ष केले जाते. जोपर्यंत अशा वक्तव्यांवर कठोर कारवाई होत नाही, तोपर्यंत राजकारणातील ही घसरण थांबणे कठीण आहे. पक्षातील वरिष्ठ नेत्यांना जर या प्रकारांना आळा घालण्याची इच्छा नसेल, तर सुसंस्कृत राजकारणाची अपेक्षा करणे व्यर्थ ठरेल.





