Gold-Silver Rate : डॉलर वधारल्याने सोने-चांदीचे कोसळले दर…

नवी दिल्ली – डोनाल्ड ट्रम्प यांनी अमेरिकेच्या अध्यक्षपदाचा कारभार स्वीकारण्यापूर्वी चीन, मेक्सिको, कॅनडाविरुद्ध व्यापार युद्धाची घोषणा केली आहे. यामुळे अगोदरच बळकट होत असलेला डॉलर आणखी वधारला. या घडामोडीचा विविध बाजारावर परिणाम होत आहे. युरोप, आशिया खंडातील शेअर बाजाराचे निर्देशांक कमी झाले. तर सोने आणि चांदीचे दर कोसळले.
दिल्ली सराफात सोन्याचा दर 1,250 रुपयांनी कमी होऊन 78,150 रुपये प्रति दहा ग्रॅम झाला. तयार चांदीचा दर 1,100 रुपयांनी कमी होऊन 90,600 रुपये प्रति किलो या पातळीवर गेला. बरीच जागतिक गुंतवणूक डॉलर केंद्री उत्पादनाकडे वळत आहे. त्यामध्ये अमेरिकेच्या कर्जरोख्याचा समावेश आहे.
डॉलर बळकट होण्याबरोबरच अमेरिकेच्या कर्जरोख्यावरील परतावा वाढत आहे. तर शेअर बाजार आणि सोन्यावर परिणाम होत आहे. हीजबुल्ला आणि इस्त्राईल दरम्यान संघर्ष थांबण्याची शक्यता असल्यामुळे सोन्याचे आकर्षण कमी झाले आहे.
China–US Trade War : चीनमधून अमेरिकेत होणार्या आयातीवर 35 टक्के आयात शुल्क लावणार – डोनाल्ड ट्रम्प
अमेरिकेचे पत धोरण कसे राहते, रशिया – युक्रेन युध्द कसे वळण घेते आणि ट्रम्प आगामी काळात जागतिक व्यापाराबाबत काय भूमिका घेतात याकडे गुंतवणूकदारांचे लक्ष लागले आहे. त्यामुळे लघु ते मध्यम पल्यात सोने आणि चांदीचे दर अस्थिरराहण्याची शक्यता विश्लेषकानी व्यक्त केली.





