China–US Trade War : चीनमधून अमेरिकेत होणार्या आयातीवर 35 टक्के आयात शुल्क लावणार – डोनाल्ड ट्रम्प

वॉशिंग्टन – अध्यक्षपदाचा कार्यभार स्वीकारण्यापूर्वीच डोनाल्ड ट्रम्प यांनी व्यापार युद्ध सुरू केले आहे. ट्रम्प यांनी सांगितले की, कॅनडा आणि मेक्सिकोतून अमेरिकेत होणार्या आयातीवर तब्बल 25 टक्के आयात शुल्क लावण्यात येईल. चीनवर यापेक्षा जास्त म्हणजे 35 टक्के एवढ्या शुल्क लावण्यात येईल.
मेक्सिको आणि कॅनडावर लावण्यात येणार्या आयात शुल्काचे समर्थन करताना ट्रम्प यांनी सांगितले की, कॅनडा आणि मेक्सिकोतून अमेरिकेत गुन्हेगार आणि अमली पदार्थ येतात. या दोन देशांना धडा शिकवण्याची गरज आहे. यावर कॅनडातील वरिष्ठ अधिकार्यांनी सांगितले की, जर अमेरिकेने कॅनडाच्या उत्पादनावर 25% आयात शुल्क लावले तर कॅनडाची अर्थव्यवस्था उद्ध्वस्त होऊन बेकारी मोठ्या प्रमाणात वाढण्याचा धोका निर्माण होईल.
तर मेक्सिकोच्या नेत्यांनी सांगितले की, अमेरिकेने आपल्या नागरिकांना अंमली पदार्थाचे सेवन करू नये यासाठी शिकवण देण्याची गरज आहे. अंमली पदार्थ घेणार्या अमेरिकन लोकांची शिक्षा मेक्सिकोला मिळत असल्याचे सांगण्यात आले. जोपर्यंत कॅनडा आणि मेक्सीकोतील सरकार ड्रग आणि गुन्हेगार अमेरिकेत पाठवणे थांबवणार नाहीत तोपर्यंत हे शुल्क चालूच राहील असा इशारा ट्रम्प यांनी दिला आहे.
ट्रम्प यांच्या घोषणेनंतर अगोदरच बळकट होत असलेला डॉलर अधिक बळकट झाला. युरोप, चीन आणि आशिया खंडातील देशातील शेअर बाजाराचे निर्देशांक कमी झाले. जर्मनीचे व्हाईस चान्सलर रॉबर्ट हेबॅक यांनी सांगितले की, यामुळे सर्वच देशावर नकारात्मक परिणाम होणार आहे. अमेरिकेन शुल्क लावल्यानंतर अमेरिकन नागरिकांना या वस्तू महाग मिळतील.अमेरिकेत महागाई वाढून व्याजदर उच्च पातळीवर राहतील. त्यामुळे अमेरिकेचेच नुकसान होईल असे अर्थतज्ञ सांगत आहेत.
PSB : कर्ज पुरवठा वाढविण्यासाठी येत्या 4 महिन्यात सरकारी बँका अनेक योजना आणणार – एम नागराजू
चीनचा अमेरिकेला विवेकाचा सल्ला
दरम्यान मुक्त अर्थव्यवस्था जगासाठी चांगली असल्याचे गेल्या 100 वर्षात पुन्हा -पुन्हा सिद्ध झाले आहे. त्यामुळे अमेरिकेने जर व्यापार युद्ध सुरू केले तर त्यामध्ये कोणाचाही फायदा होणार नाही. यामध्ये अमेरिकेचाही समावेश आहे असे चीनच्या सरकारने म्हटले आहे. ट्रम्प यांचा हा निर्णय बेजबाबदारपणाचा ठरेल. कॅनडा आणि मेक्सिको विरोधात अंमली पदार्थांमुळे व्यापार शुल्क लावल्याचे ट्रम्प यांचे म्हणणे आहे मात्र चीनमधील अमली पदार्थ संदर्भातील नियम जगात सर्वात जास्त कडक आहेत. यामुळे चीनच्या विरोधात जास्त आयात शुल्क का लावले जात आहे असा सवाल चीनच्या परराष्ट्र व्यवहार खात्याच्या प्रवक्त्याने केला.





