Satara News : यंदा गुढीपाडव्याला पुरणपोळीचा नैवेद्य कठीण? बाजारपेठेत शुकशुकाट, नेमकं कारण काय?
Satara News : जागतिक युद्धाच्या सावटाखाली यंदाचा गुढीपाडवा; गॅस टंचाईच्या अफवेमुळे नागरिक सिलिंडरच्या रांगेत, खरेदीकडे पाठ.

Satara News – साडेतीन मुहुर्तापैकी एक असणारा गुढीपाडवा सण अवघ्या तीन दिवसांवर आला असताना बाजारपेठेत मात्र शुकशुकाट पहायला मिळत आहे. अमेरिका, इस्त्राईल, इराण युद्धामुळे गॅस टंचाई निर्माण झाल्याची अफवा पसरल्याने ग्राहक गॅस सिलिंडर च्या मागे लागले आहेत. यामुळे बाजारातील खरेदीला ब्रेक लागला असून साखर गाठी उत्पादनावर यांचा परिणाम झाल्याचे व्यवसायिकांकडून सांगण्यात येत आहे.
मराठी नवीन वर्षाची सुरुवात गुढीपाडवा सणापासून होते. या सणाला सोने-चांदी, नवीन वस्तू, घर, वाहन खरेदी, नवीन व्यवसाय सुरु केला जातो. घरावर गुढी उभारुन पुरणपोळीचा नैवेद्य बनवला जातो. यंदा हा सण गुरुवार दि. 19 मार्च रोजी आहे. मात्र, या सणाला युद्धाचे ग्रहण लागले आहे. युद्धामुळे संपूर्ण जनजीवन विस्कळीत झाले आहे.
गॅस टंचाई निर्माण झाल्याने गृहिणी ते हॉटेल व्यवसायिकासह सगळेच चिंतेत आहेत. गुढीला साखरगाठी लावण्याची परंपरा आहे. त्यानुसार साताऱ्यातील व्यवसायिक अनेक वर्षापासून मागणीपेक्षा दुप्पट साखर गाठी बनवतात. यंदा मात्र, जेवढी मागणी आहे, तेवढ्याच साखर गाठी बनवण्यात आल्याची माहिती व्यवसायिकांकडून देण्यात आली आहे. व्यवसायिक गॅस सिलिंडर मिळत नसल्याने साखरगाठी बनवण्यावर परिणाम झाला आहे.
गृहिणींनी तर पुरणपोळी च्या नैवेद्यावर ब्रेक लावण्याचा निर्णय घेतला आहे. त्या साधा नैवेद्य बनवून सण साजरा करण्यावर भर देणार आहेत. बाजारपेठेतही शुकशुकाट पसरला आहे. नवीन वस्त्र खरेदीकडे अनेकांनी पाठ फिरवली आहे. कोणतीही नवीन वस्तू खरेदीवर ऑफर असतानाही प्रतिसाद कमी मिळत आहे. सोन्या-चांदीचे दर गगनाला भिडले आहेत. यामुळे पाडव्यादिवशी सोने खरेदीकडे पाठ फिरवली जाणार आहे.
अजून युद्ध सूरु असल्याने दिवसेंदिवस सगळ्यांच्या चिंता वाढत आहेत. महागाईच्या झळा जाणवत असल्याने सगळे पैशाचा जपून वापर करत आहेत. तसेच मार्च महिन्यात थकीत बिले भरली जातात. या थकीत बिलाचाही भार वाढल्याने सर्वसामान्यांचे कंबरडे चांगलेच मोडले आहे. यामुळे सणाचा उत्साह कमी झाल्याचे चित्र दिसून येत आहे.






